15 December, 2024
विपश्यनेच्या माध्यमातून आनंदी गावे निर्माण करावीत -- जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 15 : आनंद ही स्वत:ची अनुभती आहे. ते आपल्या स्वत:लाच तयार करावी लागते. प्रत्येक माणसाचे आनंदाचे स्त्रोत वेगवेगळे आहेत. भूतान हा सर्वांत आनंददायी देश आहे. आनंद निर्माण करण्याचे प्रकल्प विपश्यना आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी तणाव व विकार, व्यसनापासून मुक्ती मिळविण्यासाठी विपश्यना हे अत्यंत महत्वाचे साधन असून या माध्यमातून आपल्या गावात दररोज ध्यान शिबिरे घेऊन आपले गाव आनंदी गाव निर्माण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी चिंचोली येथील नागरिकांना केले.
हिंगोली तालुक्यातील चिंचोली (महादेव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आनंदी गाव उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, आश्विनकुमार माने, गटविकास अधिकारी डी. आय. गायकवाड, विपश्यना आचार्य डॉ. संग्राम जोंधळे, विपश्यना वरिष्ठ सहाय आचार्य डॉ. श्रीराम राठोड, विपश्यना सहायक आचार्य शरद चालीकवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आनंदी गाव उपक्रमांची संकल्पना व त्याचे महत्व याविषयीची माहिती प्रास्ताविकात दिली.
यावेळी विपश्यना आचार्य डॉ. संग्राम जोंधळे यांनी सुखशांतीचे जीवन जगण्यासाठी व अंतरमनातून आनंद मिळण्यासाठी विपश्यना आवश्यक असल्याचे सांगून आनंदी गाव उपक्रमाची सुरुवात परभणी जिल्ह्यातील कावलगाव (ता. पुर्णा) या गावातून झाली असल्याचे सांगितले. आचार्य डॉ. श्रीराम राठोड यांनी आनपान ही ध्यान साधना विद्यार्थ्यांसाठी अतिशय लाभदायी असल्याचे सांगितले. तर शरद चालीकवार यांनी दुखा:वर मात करण्याची ताकद साधनेत असल्याचे सांगून त्यांचे अनुभव कथन केले.
यावेळी आनंदी गाव कावलगाव येथे राबविण्यात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती चित्रफितीद्वारे उपस्थित नागरिक, विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी चिंचोली गावचे सरपंच, पोलीस पाटील, विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment