31 December, 2024

ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी केल्यास होणार कारवाई : आयुक्त (साखर) डॉ. कुणाल खेमनार

• ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन हिंगोली, दि. 31 (जिमाका) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतुकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी चालू गाळप हंगामात येणार नाही याची कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश पुणे येथील आयुक्त (साखर) डॉ. कुणाल खेमनार यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील ऊस तोडणी मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांचेकडून ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास जिल्ह्यातील साखर कारखान्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्या आहेत. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी केल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक साखर विश्वास देशमुख यांनी केले आहे. भाऊराव चव्हाण ससाका लि. डोंगरकडा, ता. कळमनुरी साठी शेतकी अधिकारी व्ही.एम. जोशी मो. ९१४५०४६१७५, पुर्णा सहकारी साखर कारखाना, वसमतनगर साठी जनसंपर्क अधिकारी आर. पी. गुंडाळे, ९४२१३८१३१४, कपीश्वर शुगर अँड केमिकल लिमिटेड, जवळा बाजार, ता. औंढा नागनाथ, मुख्य शेतकी अधिकारी आर. एस. देशमुख, ९८८१९०४५५५, टोकाई सहकारी साखर कारखाना कुरुंदा, ता. वसमतनगर साठी शेतकी अधिकारी पी. जी. गायकवाड ९४२२१७६०९८, शिऊर सहकारी साखर कारखाना प्रा. लि. वाकोडी, ता. कळमनुरी मुख्य शेतकी अधिकारी एम. व्ही. पतंगे ९४०४९००८२८यांच्याशी संपर्क साधावा. ऊस तोडणी मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून ऊस तोडणी करताना, ऊस पिक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख पैशांची व अन्य वस्तू / सेवा यांची मागणी केली जाते. ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस टाळाटाळ केली जाते / ऊस योग्य प्रकारे तोडला गेला नाही अशा प्रकारच्या आर्थिक पिळवणूकीच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहेत. राज्यात चालू 2024-25 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसांत गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता वाढली असल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊन ऊस लवकर गाळपास जावा याकरिता अनुचित मार्गाचा अवलंब करू नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालयाचे स्तरावरही ऊस गाळपाच्या संदर्भात नियमितपणे आढावा घेतला जाणार असून कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही याचे नियोजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. अशा स्वरुपाच्या प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणुक करुन तक्रारनिवारण अधिकारी यांचे नाव, संपर्क मोबाईल नंबर याची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी होत असलेल्या गावांमध्ये कारखान्याच्या गटऑफिसवर व ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. याबाबतची व्यापक प्रसिद्धी सर्व प्रसिद्धी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात अशी तक्रार साखर कारखान्याकडे परिशिष्ट-अ मधील नमुन्यात घटना घडल्यावर लगेच करावी व त्याची पोहच घ्यावी. या कामाकरिता नेमलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीचे निवारण सात दिवसात करावे. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर यांनी सदरची रक्कम मजूर, मुकादम, वाहतुक कंत्राटदार यांचे बिलातून वसूल करून संबंधित शेतकऱ्यांना अदा करावी. सदर तक्रारीचे निवारण कारखान्याकडून न झाल्यास नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड यांचा rjdsnanded@rediffmail.com ईमेलवर तक्रार करावी व प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सत्यता पडताळून प्राप्त तक्रारीचे निवारण करावे, असेही परिपत्रकात नमूद केले आहे. 00000

No comments: