23 December, 2024

निपुण हिंगोली कार्यक्रमांतर्गत पेडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी यांची भेट

हिंगोली (जिमाका), दि. 23 : हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे मराठी इंग्रजी व गणित विषयातील पायाभूत क्षमता प्राप्त करण्यासाठी निपुण हिंगोली हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दि. 20 डिसेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन संवाद साधला. या कार्यक्रमांतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी इयत्ता 2 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती करण्यात आली होती. वर्गात वेगवेगळ्या स्तरावर विद्यार्थी असतात आणि त्यांना स्तरानुसार अध्यापन करणे गरजेचे आहे. म्हणून निपुण हिंगोली हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शिक्षकांशी संवाद साधताना स्पष्ट केले. शिक्षकांचे शाळेवरील अनुपस्थिती बाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना त्यांनी मुख्याध्यापकांना जाब विचारला. या शाळेतील इयत्ता चौथी विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निहाय पडताळणी केली. मुलांच्या शिकण्यामध्ये फारसा फरक दिसून आला नाही. तेव्हा शिक्षकांना विचारणा केली असता त्यांनी स्तरानुसार कृती कार्यक्रम तयार केलेला नव्हता. तसेच विद्यार्थ्यांना पुढील स्तरावर नेण्यासाठी कोणकोणत्या कृती कराव्यात, हे सांगता आले नाही. मात्र या उलट इयत्ता 6 वीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चितीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता समाधान व्यक्त केले. या वर्गाच्या शिक्षिकेच्या प्रगतीचे कौतुकही केले. विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारणा करताना यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचाही आढावा घेतला. वारंवार पालक भेटी घेऊन, सभा घेऊन विद्यार्थी उपस्थितीसाठी शिक्षकांने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी पेडगाव शाळेच्या मुख्याध्यापकांनी जानेवारी 2025 अखेरपर्यंत सर्व विद्यार्थी अंतिम स्तरावर पोचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. ******

No comments: