15 December, 2024

विपश्यना केंद्र विकसित करण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात येईल -- जिल्हाधिकारी अभिनव गोयल

• आनंददायी व तणावमुक्त जीवन जगण्यासाठी विपश्यना ही साधना अत्यंत उपयुक्त-जिल्हाधिकारी • जिल्हाधिकारी अभिनव गोयल व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण हिंगोली (जिमाका), दि. 15 : चिंचोली येथे उभारण्यात आलेल्या विपश्यना केंद्र चांगल्या पध्दतीने विकसित करण्यासाठी परिसरात पाणी, वीज, रस्त्याची कामे प्राधान्याने करण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले. हिंगोली जिल्हा विपश्यना समितीच्या वतीने तसेच सामाजिक वनीकरण विभाग उगम ग्रामीण विकास संस्थेच्या पुढाकाराने हिंगोली तालुक्यातील चिंचोली (महादेव) येथील धम्मदेस विपश्यना केंद्रावर आनापान, विपश्यना परिचय सत्र व वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. अभिनव गोयल बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, आश्विनकुमार माने, गटविकास अधिकारी डी. आय. गायकवाड, उगम संस्थेचे जयाजी पाईकराव, विपश्यना आचार्य डॉ. संग्राम जोंधळे, विपश्यना वरिष्ठ सहाय आचार्य डॉ. श्रीराम राठोड, विपश्यना सहायक आचार्य शरद चालीकवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विपश्यनामुळे स्वत: आत्मलीन होऊन सर्वामध्ये शांती, समाधान निर्माण करण्याचे चांगले काम होत आहे. या विपश्यनाच्या माध्यमातून शांतीचा संदेश देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांसाठी किमान दहा दिवसांचे शिबीर झाले पाहिजेत. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आनंददायी व तणावमुक्त जीवन जगण्यासाठी विपश्यना ही साधना अत्यंत उपयुक्त आहे. काय चूक आणि काय बरोबर यावर नियंत्रण आणण्यासाठी आनपान ही ध्यान साधना श्वासाच्या माध्यमातून करुन ती सोडवता येते. जिल्ह्यात विपश्यना केंद्राची सुरुवात हिंगोली तालुक्यातील चिंचोली येथे चांगल्या पध्दतीने सुरु आहे, ही आनंदाची बाब आहे. जिल्ह्यातील नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले जीवन जगण्यासाठी टप्प्याटप्प्याने विपश्यना साधनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी यावेळी उपस्थित नागरिक, अधिकारी, कर्मचारी, साधकांना केले. अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी शांतीचा संदेश देण्यासाठी व सेवाभाव कायम मनामध्ये ठेवण्यासाठी विपश्यना हा चांगला उपक्रम आहे. चिंचोली येथील विपश्यना केंद्राची जागा एकदम चांगली असून येथे वेगवेगळ्या ठिकाणावरुन येणाऱ्या साधकासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याठिकाणी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. तसेच त्यांच्या सेवेच्या कालावधीत आलेल्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना करण्यासाठी विपश्यनेचा उपयोग होतो, याची माहितीही त्यांनी प्रास्ताविकात दिली. यावेळी विपश्यना आचार्य डॉ. संग्राम जोंधळे यांनी नैसर्गिक श्वासाच्या अवागमनाचे निरीक्षण आनपान या साधनेच्या माध्यमातून होते. धावपळीच्या जीवनात जगत असताना अंतरमनातून आनंद मिळण्यासाठी व आनंदी जीवन जगण्यासाठी विपश्यना आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विपश्यना केंद्राची गरज आहे, असे सांगितले. विपश्यना आचार्य डॉ.श्रीराम राठोड यांनी विपश्यना ही अमूल्य विद्या असून सत्यनारायण गोयंका यांच्या माध्यमातून ही सेवा भारतात सुरु करण्यात आली आहे. ही विद्या सर्वकालिक आहे. यामुळे मानसिक आजारासह सर्व आजार दूर होतात. आनपानाच्या साधनेमुळे मन शांत होते. ही संधी हिंगोली येथे उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विपश्यना समितीच्या वतीने विपश्यना केंद्रासाठी आवश्यक पाणी, वीज, रस्ता, कंपाऊंडसाठी तरतूद उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आनापान, विपश्यना याविषयी परिचय करुन देण्यात आले. तसेच यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सहायक लागवड अधिकारी टी.एम.सय्यद यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, साधक, साधिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. *******

No comments: