26 December, 2024
डाक विभागाच्या राष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेस 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 26 : भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या ‘ढाई अक्षर’ या पत्रलेखन स्पर्धेची आता मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवलेली असून या पत्र लेखन स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थी आणि जनतेने जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन डाक अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी केले आहे.
या पत्रलेखनाचा विषय ‘लिखाणाचा आनंदः डिजिटल युगात पत्रांचे महत्त्व’ असा असून, पत्र कोणत्याही भाषेमधून लिहिता येणार आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात असून, 0 ते 18 आणि 18 वर्षापासून पुढे अशा दोन गटात होणार आहे. त्याकरिता स्पर्धकांनी 1 जानेवारी 2024 'माझे वय 18 पेक्षा कमी/जास्त आहे, असा स्पष्ट उल्लेख करावा, तसेच आपले नाव, पत्ता व वयाचा उल्लेख करावा. जसे कि 'मी असे प्रमाणित करतो कि माझे वय दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षापेक्षा अधिक किंवा 18 वर्षापेक्षा कमी आहे.’
हे पत्र मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई- 400001 यांच्या नावाने लिहून जवळच्या पत्रपेटीत किंवा टपाल कार्यालयात द्यावयाचे आहे. ए-4 साईजच्या कोऱ्या कागदावर 1000 शब्दमर्यादेत लिहावे. आंतरदेशीय पत्राचा वापर केल्यास 500 शब्दांची मर्यादा आहे. हे पत्र 31 जानेवारी 2025 पर्यंत असून, मुदतीनंतर प्राप्त पत्रांचा स्पर्धेत समावेश होणार नाही. दोन्ही वयोगटासाठी पाकीट आणि आंतरदेशीय पत्र अशा दोन्ही गटात एकूण अनुक्रमे प्रत्येकी 4 प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडले जातील.
निवड झालेल्या उत्कृष्ट पत्रांसाठी राज्यस्तरावर प्रथम 25, द्वितीय 10 आणि तृतीय पारितोषिक 5 हजार रुपये प्रदान करण्यात येईल. तसेच राज्यस्तरावर प्रत्येक गटातून निवड झालेल्या तीन उत्कृष्ट पत्रांना राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात येईल आणि राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रांसाठी अनुक्रमे 50, 25 आणि 10 हजार रुपयांचे रोख पारितोषक देण्यात येणार आहे. तरी या लेखन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन डाक अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment