13 December, 2024
नवउद्योग उभारणीसाठी साठी स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत कर्ज • कर्जाची माहिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी मेळाव्याचे आयोजन
हिंगोली, दि. 13 (जिमाका): केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली असून, या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी हिस्स्यामधील 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या सामाजिक कार्यकर्त्यांना स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योग उभारण्यासाठी 10 लाख ते 1 कोटीपर्यंतचे कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नवउद्योगासाठी आवश्यक कर्ज घेण्यासाठी अर्ज करण्याबाबत, अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे व कर्ज मिळविण्याबाबत सखोल माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून देण्यात येणार आहे.
नवउद्योग उभारण्यासाठी कर्जाची माहिती देण्यासाठी दि. 17 डिसेंबर, 2024 रोजी दु. 4.00 वाजता सांस्कृतिक भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे विभागीय व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, नांदेड हे व त्यांचे इतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त सुशिक्षीत बेरोजगार तरुणांनी या महामेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन यादव गायकवाड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment