20 December, 2024

महेश टापरे हिंगोली जिल्ह्यातील पहिला लेफ्टनंट जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाला सन्मान

हिंगोली (जिमाका), दि. 20 : शहरातील सिताराम नगरीत वास्तव्यास असलेले तथा मूळचे पांगरी गावाचे रहिवाशी कडूजी टापरे (माजी सैनिक) यांचा मुलगा महेश टापरे याने पहिल्याच प्रयत्नात एनडीए आणि आयआयटी परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. काही दिवसातच महेश हा सैन्य दलातील लेफ्टनंट या पदावर रुजू होणार आहे. त्याच्या या यशामुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते आज शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महेशचे वडील माजी सैनिक नाईक कडूजी टापरे, मामा आनंद साळवे, जिल्हा सैनिकी कार्यालयातील कॅप्टन मुकाडे, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद मीर, जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव जांबुटकर, सहसचिव पंडीत हाके आदी माजी सैनिक उपस्थित होते. महेशचे वडील हे माजी सैनिक असल्याने महेशला लहानपणापासूनच सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्याने सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी एनडीए परीक्षा देण्याचे ठरविले. केवळ दोन महिन्यात त्याने एनडीएची तयारी केली. उच्च काठिण्य पातळी असलेल्या 10 परीक्षांमध्ये एनडीए येत असल्याने त्याला यश मिळवणे एवढे सोपे नव्हते. त्याने कुठलेही क्लास न लावता घरीच अभ्यास करून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ही परीक्षा तसेच पाच दिवासाच्या मुलाखतीमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. महेशकडे आपले करिअर घडविण्यासाठी आय.आय.टी. व एन.डी.ए. अशा दोन सुवर्णसंधी असताना त्याने सैन्य दलात अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे ठरविले. एनडीए परीक्षेतून अधिकारी होणारा महेश हा हिंगोली जिल्ह्यातील पहिलाच अधिकारी आहे. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महेशचे वय अवघे 18 वर्षे असून, त्याचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय, दिल्ली आणि अहमदाबाद येथे व माध्यमिक शिक्षण विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल येथे पूर्ण झाले आहे. त्याने नुकतीच आदर्श महाविद्यालय येथून मार्च-2024 मध्ये 12 वी ची परीक्षा 85 टक्के घेऊन उत्तीर्ण केली होती. त्यांनी मागील एक वर्षापासून घरीच जेईई, आयआयटी करिता ऑनलाईन क्लास लावले होते आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची काठिण्य पातळी असलेली जेईई मेन्समध्ये व जेईई ॲडव्हॉन्स परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्याला आयआयटी गोवा येथे प्रवेशही मिळाला आहे. *****

No comments: