31 December, 2024

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम शासकीय जिल्हा ग्रंथालयात 1 ते 15 जानेवारी दरम्यान ‘ग्रंथप्रदर्शन’

हिंगोली, दि. 31 (जिमाका) : राज्यभर 1 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पंधरवाड्यादरम्यान येथील शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 20 डिसेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करुन या विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम राबविण्याचे जाहीर केले आहे. या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य, कार्यशाळा, वाचन संवाद, साहित्यिकांच्या मुलाखती, चर्चा, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करुन अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग व सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरीय समित्यांची रचना करण्यात आली आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून शासकीय जिल्हा ग्रंथालयात 1 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून नागरिक, वाचक, सभासद, विद्यार्थी, अभ्यासक यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रंथपाल त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 000000

No comments: