18 December, 2024

आजपासून सुशासन सप्ताहाला प्रारंभ

नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रशासन गावपातळीवर हिंगोली, (जिमाका) दि.१८ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसंदर्भात सामान्य नागरिकांना माहिती व्हावी तसेच यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण व निवृत्तीवेतन विभागामार्फत उद्यापासून सुशासन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत यासंदर्भात देण्यात आलेल्या निर्देशानुसार 19 ते 24 डिसेंबर या कालावधीत सर्व कार्यालयाने सुशासन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करणे, त्यांना सुलभ सेवा पुरविणे, जिल्हा, उपविभाग, तहसील स्तरावरील योजनांची कालबद्ध अंमलबजावणी करणे. याबाबत शिबीर आयोजित करण्याचे केंद्रीय विभागाने सुचविले असून जिल्ह्यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी स्पष्ट केले आहे. या शिबिरामध्ये नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, आपले सरकारसह विविध पोर्टलवर प्राप्त तक्रारीचे निराकरण, ऑनलाईन देण्यात येणाऱ्या सेवांचा वेळेत निपटारा करणे, सेवा देण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा जास्तीत-जास्त वापर करणे आदी निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात आयोजित विविध शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. *****

No comments: