10 December, 2025

वसमत तालुक्यातील 11 कृषि निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित

हिंगोली (जिमाका), दि. 10: जिल्ह्यात रब्बी हंगामाची पेरणी जवळपास पूर्ण झाली असून खताच्या दुसऱ्या डोससाठी शेतकऱ्यांकडून डीएपी व युरिया खताची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. वसमत तालुक्यात बाजारात खते उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना पुरवठा न केल्याबाबत तक्रारी तालुका गुणनियंत्रण निरीक्षकांकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथकाद्वारे सलग चार दिवस वसमत येथील कृषि निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ज्या विक्री केंद्रांवर अनियमितता आढळून आली, त्या केंद्रांवर परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडून परवाना निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. खत नियंत्रण आदेश 1985 अन्वये वसमत शहरातील एकूण 11 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असून त्यामध्ये जय किसान कृषि केंद्र, बसवेश्वर कृषि केंद्र, श्री व्यंकटेश्वरा अॅग्रो एजन्सी, शिवछत्रपती अॅग्रो सोल्युशन, माऊली कृषि केंद्र, श्री साई फर्टीलायझर्स, बाहेती कृषि सेवा केंद्र, हरी ओम कृषि केंद्र, ओम कृषि केंद्र, बजरंग कृषि केंद्र व गुरुकृपा कृषि केंद्र यांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील कोणताही कृषि निविष्ठा विक्रेता चढ्या दराने विक्री, साठवणूक, लिंकींग अथवा अन्य अनियमितता करत असल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशी ताकीद जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली आहे. ******

No comments: