31 December, 2025
घर-घर संविधान कार्यक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 31 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त हिंगोली शहरातील नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे घर-घर संविधान कार्यक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन आज उत्साहात पार पडले. या दोन्ही वसतिगृहांमधील विद्यार्थिनी, त्यांचे पालक व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विशेष अधिकारी अमोल घुगे, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती एस. डी. घुगे उपस्थित होते. पालक प्रतिनिधी म्हणून रमेश सोनटक्के, विजय पडघणे, हरिभाऊ पोपळघट, राजू ससाने, विनोद कागणे, मोतीराम फड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी अमोल घुगे व श्रीमती गीता गुठ्ठे यांनी घर-घर संविधान उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी वसतिगृहातील अभ्यासिकेचा पुरेपूर लाभ घेऊन सातत्याने अभ्यास करावा व आपल्या कुटुंबाचे व वसतिगृहाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.
घर-घर संविधान अमृतमहोत्सव निमित्त वसतिगृहात घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला व रांगोळी स्पर्धांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तद्नंतर सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रवेशित विद्यार्थिनींनी स्वागतगीत व देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहपाल श्रीमती सुलोचना ढोणे यांनी केले. सूत्रसंचालन कु. ऋतुजा सुरुसे व कु. प्रिती मोरे यांनी केले.
या कार्यक्रमास विद्यार्थिनी, त्यांचे पालक तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment