26 December, 2025
हिंगोलीत ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा; विविध स्पर्धांतून बालकांच्या शौर्याला अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 26: भारताच्या गौरवशाली इतिहासातील वीर बालकांच्या शौर्य व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी 26 डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ निमित्त हिंगोली येथील श्री स्वामी समर्थ बालगृह (खानापूर चित्ता) तसेच सरस्वती मुलींचे निरीक्षण गृह व बालगृह (सावरकर नगर) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा महिला व बाल विकास विभागातील अधिकारी व मान्यवरांनी बालकांशी संवाद साधून वीर बालकांचा शौर्याचा वारसा, त्यांचा त्याग व उदात्त मूल्यांबाबत मार्गदर्शन केले. व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून मुला-मुलींना वीर बालकांचे ऐतिहासिक महत्त्व व त्यांचे बलिदान समजावून सांगण्यात आले. या उपक्रमामुळे बालकांमध्ये देशभक्ती, नैतिक मूल्ये व आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत झाली.
बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कॅरम, लगोरी यांसारख्या क्रीडा स्पर्धांमधून बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. आर. दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले, सदस्य पी. आर. हेंबाडे, संगीता दुबे, किरण कर्डेकर तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे, जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण, चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे व केस वर्कर राजरत्न पाईकराव यांनीही बालकांशी संवाद साधला. मान्यवरांनी वीर बालकांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन धैर्य, प्रामाणिकपणा व आत्मसन्मान जपण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरस्वती मुलींचे निरीक्षण व बालगृहाचे अधीक्षक शंकर घ्यार तसेच श्री स्वामी समर्थ बालगृहाचे अधीक्षक रमेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment