09 December, 2025
दूरदर्शनच्या कृषी कार्यक्रमांचे नियोजन जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीचे वेळापत्रक निश्चित
हिंगोली (जिमाका), दि. 09 : दूरदर्शन केंद्र, मुंबई यांच्या कृषीविषयक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र येथे दि. 8 डिसेंबर 2025 रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘कृषिदर्शन’आणि ‘आमची माती, आमची माणसं’या कार्यक्रमांतील विषयांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांपर्यंत नवीन कृषी तंत्रज्ञान, संशोधन व नवकल्पनांची माहिती सोप्या भाषेत पोहोचवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. यासाठी दूरदर्शनचे अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतकरी यांनी एकत्रितपणे विषयनिहाय सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत निवडलेल्या विषयांनुसार आगामी कार्यक्रमांमध्ये चिया बियांची शेती, सेंद्रिय शेती पद्धती, गायीच्या शेणापासून धूप व अगरबत्ती निर्मिती, मोहाच्या फुलांपासून प्रक्रिया पदार्थ, हळद प्रक्रिया उद्योग, यशस्वी रोपवाटिका व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या यशोगाथा, आधुनिक कृषी अवजारे तसेच सोयाबीन पिकासाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीचा समावेश करण्यात येणार आहे.
या बैठकीचे आयोजन तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके यांनी केले. बैठकीस दूरदर्शनचे मनोज जैन, विनायक मोरे व सुदर्शन चापके (परभणी) उपस्थित होते. संत नामदेव संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव माने यांनी दूरध्वनी संदेशाद्वारे उपस्थितांचे स्वागत करून हिंगोली जिल्ह्यातील सिंचन अनुशेषाबाबत दूरदर्शनने सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यांच्या वतीने श्री. महेंद्र माने व सौ. माधुरी माने उपस्थित होत्या.
यावेळी जालना येथील शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. सोनुने, पालघर येथील रिजवाना सय्यद तसेच तोंडापूर केव्हीकेचे शास्त्रज्ञ राजेश भालेराव, श्रीमती रोहिणी शिंदे व डॉ. अतुल मुराई यांनी सहभाग घेतला. प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर असोले व चंद्रकांत देशमुख यांनीही सूचना केल्या.
आगामी काळात महिला शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच शेतीमालावर प्रक्रिया करून उत्पन्नवाढ कशी साधता येईल, याविषयीचे कार्यक्रम दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment