16 December, 2025
जलयुक्त शिवार अभियान 2.0 व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत कामांना गती द्यावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 16 : जलयुक्त शिवार अभियान 2.0 व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 तसेच गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार योजना अंतर्गत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी, हिंगोली व वसमतचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंपदा अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी उपसंचालक तसेच जलसंधारण अधिकारी (लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद) उपस्थित होते.
बैठकीत कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 चा आढावा घेण्यात आला. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 39 गावांची निवड करण्यात आली असून, कळमनुरी तालुक्यातील 2 व सेनगाव तालुक्यातील 1 असे 3 प्रकल्प मंजूर झाले आहेत. कळमनुरी तालुक्यातील प्रकल्प क्रमांक 1 निळकठेंश्वर संस्थेकडे तर प्रकल्प क्रमांक 2 तालुका कृषी अधिकारी, कळमनुरी यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी मृद व जलसंधारण कामांची केवळ 25 ते 27 टक्केच प्रगती झाल्याने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामांच्या प्रगतीत वाढ न झाल्याने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस देण्याचे आदेश त्यांनी दिले. सेनगाव तालुक्यातील प्रकल्प क्रमांक 3 बाबत समाधान व्यक्त करून उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच इतर प्रकल्पांनी प्रकल्प क्रमांक 3 प्रमाणे सुधारणा करावी, असे निर्देश दिले. सर्व प्रकल्पांची मुदत 31 मार्च 2026 पर्यंत असून, विहित कालावधीत आराखड्यानुसार कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
उत्पादन पद्धतीमधील वैयक्तिक शेतकरी लाभार्थ्यांना शेती साहित्य खरेदीसाठी प्रोत्साहित करावे तसेच अनुदान खर्च होण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी यांनी विशेष मोहिम राबवून कामांच्या प्रगतीत वाढ करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत प्रत्येक प्रकल्पात एक अमृत सरोवर सादर करण्याच्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यातून मौजे बन (ता. सेनगाव) येथील एक प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पुणे कार्यालयास सादर करण्यात आला आहे. तसेच कळमनुरी तालुक्यातील मौजे तोंडापूर, येडशी व भुरक्याचीवाडी येथील प्रस्ताव जिल्हास्तरीय बैठकीत सादर करण्यात आले. अमृत सरोवर हे शासकीय गायरान अथवा शासकीय जमिनीवर घ्यावेत तसेच प्रस्तावात कामांचे फोटो, पाणीसाठा व पिकाची माहिती नमूद करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील 73 गावांची निवड करण्यात आली असून, या अभियानात जलसंधारण विभाग, लघुसिंचन (ल.पा. जि.प.), कृषी विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पूर्णा पाटबंधारे व भूजल सर्वेक्षण विभाग सहभागी आहेत. कृषी विभाग वगळता इतर विभागांनी सुमारे 90 टक्के कामे पूर्ण केली असून कृषी विभागाच्या कामांमध्ये अपेक्षित प्रगती न झाल्याने जिल्हाधिकारी गुप्ता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुधारित आराखड्यानुसार कामांची यादी सादर करून मुदतीत कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. या अभियानाची मुदतही 31 मार्च 2026 पर्यंत आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रत्यक्ष स्थळ पडताळणीबाबत जिल्ह्याला 19 हजार 858 लक्ष्य देण्यात आले असून त्यापैकी 11 हजार 948 कामांची स्थळ पडताळणी पूर्ण झाली आहे. जलसंधारण विभागाने लक्ष्य पूर्ण करून अतिरिक्त 6 हजार 473 स्थळ पडताळणी केली असून कृषी विभागाने मात्र केवळ 2 ते 3 टक्के काम केले आहे. कृषी विभागाने ते तात्काळ पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले.
याशिवाय “जलशक्ती अभियान – जल संचन जन भागीदारी” ही 1 जून 2025 ते 31 मे 2026 या कालावधीत राबविण्यात येणारी कालबद्ध मोहीम असून, पावसाच्या पाण्याची साठवणूक व प्रत्येक थेंबाचे जतन या अनुषंगाने सर्व जलसाठ्यांची गणना व जिओ टॅगिंग करण्याबाबत संबंधित सर्व विभागांना तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment