09 December, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा

• रोगनियंत्रण व गुणवत्तावाढीवर लक्ष देण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश हिंगोली (जिमाका), दि. 9 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रतिनिधी डॉ. नामदेव पवार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. शैलेजा कुपास्वामी, तसेच विविध आरोग्य कार्यक्रमांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हॉट एरिया मॅपिंग करून साखर कारखाने, वीटभट्ट्या, झोपडपट्टी वस्त्या आदी ठिकाणी विशेष तपासणी शिबिरे घेऊन क्षयरोग तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच गरोदर मातांची तपासणी करुन रुग्णांना उपचाराखाली आणून नियमित औषधोपचार देण्यावर भर देण्यात आला. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग शोध मोहिमेचा आढावा यावेळी घेण्यात आला. एनसीडी पोर्टलवरील उच्च रक्तदाब, मधुमेह व कॅन्सर स्क्रीनिंगचे कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रमांतर्गत निर्धारित निर्देशांकांची पूर्तता करून या महिन्यात 9 आरोग्य संस्था व पुढील महिन्यात 11 आरोग्य संस्था एनक्यूएएस (NQAS) प्रमाणित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. निती आयोगाने घोषित आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत हिंगोली तालुक्याने आयोगाने दिलेल्या निर्देशांकानुसार कार्यवाही करून कामगिरीत सुधारणा करावी. यासाठी बेसलाईन सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक दडपणाखाली असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करून सकारात्मक परिवर्तन घडविण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. तसेच गरोदर मातांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी एचएलएलमार्फत तपासणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यकतेनुसार औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. ******

No comments: