08 December, 2025
वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर कार्यक्रम राबविण्याचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 08: केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला स्वातंत्र्य चळवळीत विशेष स्थान असून, भारतीय जनतेला प्रेरणा देणारे हे गीत 7 नोव्हेंबर 1875 रोजी लिहिले गेले असे मानले जाते. 1896 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत प्रथम गायले. स्वातंत्र्य संग्रामाच्या अनेक ऐतिहासिक क्षणांमध्ये या गीताने राष्ट्रीय भावना जागृत केल्या. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेत तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी वंदे मातरम् ला राष्ट्रगीतातील ‘जन गण मन’ प्रमाणेच सन्मानाचा दर्जा असल्याचे जाहीर केले आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हा उपक्रम 7 ते 14 नोव्हेंबर 2025, 19 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026, 7 ते 15 ऑगस्ट 2026 (हरघर तिरंगा अभियान) व 1 ते 7 नोव्हेंबर 2026 (समारोप) या चार टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
दिनांक 24 ऑक्टोबर, 2025 तसेच 04 नोव्हेंबर, 2025 रोजी झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्राने कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली असून, त्यानुसार जिल्हास्तरावर व्यापक कार्यवाही करण्यात येणार आहे.
यानुसार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता देशभर सामूहिक गायन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, तहसील स्तरावरील केंद्रे, पोलीस विभाग, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, नागरिक हे सर्व सामुदायिक गायनात सहभागी झाले होते. तसेच प्रधानमंत्री यांचा कार्यक्रमही थेट प्रक्षेपित करण्यात आला आहे. .
प्रमुख उपक्रम
वंदे मातरम् चे सामूहिक गायन रेकॉर्ड करून मोहिमेच्या संकेतस्थळावर अपलोड करणे, शाळांमध्ये विशेष सभा, निबंध, वादविवाद, पोस्टर स्पर्धा, वंदे मातरमच्या इतिहासावर संशोधन व शिष्यवृत्ती, सीएपीएफ आणि राज्य पोलीस बँडद्वारे देशभक्तीपर कार्यक्रम, महत्त्वाच्या ठिकाणी वंदे मातरम् विषयक प्रदर्शन, प्रजासत्ताक दिन कार्यक्रमांत विशेष थीम, सार्वजनिक-खाजगी भागीदारीत ऑडिओ-व्हिडिओ बूथ उभारणी, पोर्टलवर कराओके सुविधा – नागरिकांना स्वतःच्या आवाजात गीत रेकॉर्ड करून अपलोड करण्याची संधी तसेच सर्व कार्यक्रमांचे मीडिया व सोशल मीडिया कव्हरेज आदी प्रमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत.
कराओके अपलोड प्रक्रिया
1) मोबाईल/ईमेल तपशील भरून ओटीपी प्राप्त करणे, 2) पहिले दोन कडवी गाऊन व्हिडिओ रेकॉर्ड करणे, 3)राज्य, जिल्हा, नाव इ. तपशील भरून व्हिडिओ अपलोड करणे, 4) सहभागाचे प्रमाणपत्र डाउनलोड करणे.
स्थानिक स्तरावर आयोजित सर्व कार्यक्रम मोहिमेच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. केंद्र शासनाने सूचित केलेल्या सर्व बाबींची काटेकोर अंमलबजावणी करून उपक्रम यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment