05 December, 2025
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी
नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांची माहिती
हिंगोली (जिमाका), दि. 05 : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी प्रदान करण्याबाबत महसूल व वन विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार विभागातील मंजूर पदांची संख्या आता 3 हजार 952 इतकी झाली असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी दिली आहे.
राज्याचे मुख्य सचिव व अपर मुख्य सचिव (महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी) यांच्या पुढाकाराने विभागातील सध्याच्या 3 हजार 94 पदांपैकी 107 पदे निरसित करण्यात आली असून 965 नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित शासन निर्णयान्वये एकूण 3 हजार 952 पदांचे सुधारित आकृतीबंध अंतिम करण्यात आले आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य शासनाच्या महसूल उत्पन्नात दुसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा विभाग असून, सन 2016 पासून विभागाच्या नव्या आकृतीबंधाची मागणी प्रलंबित होती. वाढत्या कामकाज, नोंदणी व्यवहारांमध्ये झालेली वाढ आणि नवीन दुय्यम निबंधक कार्यालयांची निर्मिती यामुळे सुधारित आकृतीबंधाची आवश्यकता निर्माण झाली होती.
नवीन सुधारित आकृतीबंधामुळे विभाग अधिक सक्षम, बळकट व कार्यक्षम होईल. पर्याप्त मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे शासनाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या इष्टांक पूर्तीसाठी मदत होईल, शासन महसूल वाढेल आणि नागरिकांना अधिक त्वरित व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा विभागाचा व शासनाचा मानस अधिक प्रभावीपणे राबविता येणार आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी , हिंगोली यांनी दिली आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment