01 December, 2025

कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी देण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 01: महाराष्ट्र शासन उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या दि. 28 नोव्हेंबर, 2025 च्या, शासन परिपत्रकान्वये तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या निर्गमित आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यात दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 संदर्भात महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना कोणत्याही अडथळ्याविना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक क्षेत्रात मतदार असलेल्या कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना, ते जरी कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, निवडणुकीच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे शासन आदेशात नमूद केले आहे. ही सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या अधिपत्याखालील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादींना बंधनकारक राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत, ज्या आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांची अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असेल किंवा धोकादायक, लोकोपयोगी सेवांचा प्रश्न असेल, अशा ठिकाणी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसेल. अशावेळी संबंधित कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत देणे आस्थापना मालकांसाठी अनिवार्य असेल. मतदानासाठी आवश्यक सुट्टी किंवा सवलत न मिळाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे. तसेच तक्रारींची नोंद घेण्यासाठी कार्यालयस्तरावर दक्षता कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. ******

No comments: