08 December, 2025
मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापकांची तालुकानिहाय कार्यशाळा
हिंगोली (जि.मा.का.), दि. 08 : शैक्षणिक वर्ष सन 2025-26 करीता मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मुख्याध्यापक व शिष्यवृत्ती कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना (इ. 5 वी ते 10 वी), अनुसूचित जातीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण फी व परीक्षा फी प्रतिपूर्ती योजना (इ. 10 वी), माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना (इ. 9 वी व 10 वी) तसेच अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजना इत्यादी मॅट्रीकपूर्व योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. प्रत्येक पात्र विद्यार्थ्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तालुकानिहाय कार्यशाळांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
हिंगोली तालुक्यासाठी आज सोमवार, दि. 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता, सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे आयोजन करण्यात आले आहे. कळमनुरी तालुक्यासाठी मंगळवार, दि. 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता, पंचायत समिती, कळमनुरी येथे, औंढा नागनाथ तालुक्यासाठी बुधवार, दि. 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता, पंचायत समिती, औंढा नागनाथ येथे, सेनगाव तालुक्यासाठी गुरुवार, दि. 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता, पंचायत समिती, सेनगाव येथे तर वसमत तालुक्यासाठी शुक्रवार, दि. 12 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता, पंचायत समिती, वसमत येथे कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व संबंधित शिष्यवृत्ती कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सदर कार्यशाळेस उपस्थित राहणे अनिवार्य आहे. कोणताही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेवर राहील. कार्यशाळेच्या ठिकाणाच्या नियोजनाची जबाबदारी संबंधित गटशिक्षण अधिकारी यांची राहील, असे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी गिता गुठ्ठे यांनी कळविले आहे.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment