03 December, 2025

वनहक्क धारकांना शासनाचा लाभ देण्याची कार्यवाही करावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 03 : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासींच्या सामूहिक व वैयक्तिक वनहक्काच्या दाव्यांचा जलद निपटारा करून पात्र वनहक्क धारकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिल्या. बैठकीदरम्यान वनहक्कासंदर्भातील जुने व नवीन दाखल दावे, सातबारा वाटपाची स्थिती, मोजणी पूर्ण झालेली तसेच मोजणीसाठी प्रलंबित प्रकरणे, फेरचौकशीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रकरणांची प्रगती, तसेच अपील प्रकरणांबाबत शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. वसमत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे फेरचौकशीसाठी पाठविण्यात आलेल्या दाव्यांची सद्यस्थिती, तसेच विभागीय वन अधिकारी यांच्याकडे पाठविलेल्या अपील व दाव्यांवरील अभिप्राय आणि अहवालाची स्थिती याबाबतही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी माहिती घेतली. दाव्यांच्या निपटाऱ्यास गती देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, विभागीय वन अधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. *****

No comments: