20 December, 2025

वसमत येथील नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रियेची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पाहणी

हिंगोली (जिमाका), दि. 20 : वसमत नगर परिषदेसाठी आज सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वसमत येथील विविध मतदान केंद्रांना भेट देत निवडणूक प्रक्रियेची सविस्तर तपासणी केली. मतदान केंद्रांवरील सुविधा, सुरक्षा व्यवस्था, मतदारांची ये-जा, सुयोग्य पद्धतीने केलेली रांग व्यवस्थापन आदींचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमांचे काटेकोर पालन याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. मतदान शांततेत, सुव्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी गुप्ता यांनी यावेळी दिली. त्यांनी मतदारांनी निर्धास्तपणे मतदान करावे, असे आवाहनही केले. यावेळी त्यांच्यासोबत वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: