23 December, 2025
आकांक्षीत तालुकाअंतर्गत सर्व कामाची माहिती पोर्टलवर अपडेट करावी- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 23: निती आयोगाच्या निर्देशांकानुसार आकांक्षीत तालुका हिंगोलीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजित कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच करण्यात आलेल्या प्रत्येक कामाची माहिती वेळोवेळी संबंधित पोर्टलवर अद्ययावत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आकांक्षीत हिंगोली तालुक्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, शिक्षणाधिकारी आसावरी काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निती आयोगाने दिलेल्या निर्देशांकानुसार सर्व संबंधित विभागांनी प्रत्येक महिन्याचे स्वाक्षरीयुक्त अहवाल दरमहा सादर करावेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांप्रमाणे सर्व आरोग्य उपकेंद्रे एनक्वास प्रमाणित करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करावी व त्याबाबतची माहिती सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.
उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांसाठी मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविण्यात यावा. यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करावी. तसेच आशा सेविकांमार्फत 30 वर्षांवरील नागरिकांचे स्क्रिनिंग करावे. स्क्रिनिंगनंतर नागरिकांची वर्गवारी करून त्यांचे समुपदेशन करावे. यासाठी एफएक्यू तयार करावेत व त्यानुसार सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आशा व एमपीडब्ल्यू यांना प्रशिक्षण देण्यात यावे. प्रशिक्षणासाठी वेळापत्रक व साहित्य तयार करावे. संबंधित नागरिकांचे आभा कार्ड व आयुष्मान भारत कार्ड काढून घेऊन एनएचएममार्फत त्यांचा डिजिटल डेटाबेस तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.
शिक्षण विभागाने शिक्षकांचे प्रशिक्षण शालेय वेळेत न ठेवता शनिवार व रविवारी आयोजित करावे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी ‘सुपर 50’ उपक्रम राबवावा. निवडलेल्या 50 विद्यार्थ्यांना अतिरिक्त वर्ग घेऊन त्यांची गुणवत्ता सुधारावी. तसेच आकांक्षीत 200 विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.
हिंगोली तालुक्याची आकांक्षीत तालुका म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व इतर सेवा, पायाभूत सुविधा तसेच सामाजिक विकास या सहा निर्देशांकांवर लक्ष केंद्रित करून कामकाज करावे. शाळेतील स्वच्छतागृहे, प्रधानमंत्री आवास योजना यासह विविध योजनांचा आढावा घेऊन निती आयोगाच्या निर्देशांकानुसार 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करून संबंधित डेटा निती आयोगाच्या पोर्टलवर अपलोड करावा. यामुळे आकांक्षीत हिंगोली तालुक्याची रँकिंग सुधारण्यासाठी सर्वांनी प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment