10 December, 2025

बनावट परिवहन संकेतस्थळे व फसव्या लिंकपासून सावध राहा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. 10: अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन आदी परिवहन सेवांशी संबंधित बनावट संकेतस्थळे, फसवी मोबाईल अॅप्स (APK) तसेच मोबाईल एसएमएस व व्हॉटस्अपद्वारे पाठविण्यात येणाऱ्या खोट्या लिंकच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामधून वाहनचालक व वाहनमालकांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच ओळख गैरवापराचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व वाहनचालक व वाहनमालकांनी केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहन नोंदणीसाठी VAHAN – https://vahan.parivahan.gov.in, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी SARATHI – https://sarathi.parivahan.gov.in, परिवहन सेवांसाठी https://www.parivahan.gov.in, तसेच ई-चलनासाठी https://echallan.parivahan.gov.in या संकेतस्थळांचा वापर करावा. वरील सर्व अधिकृत संकेतस्थळे ही gov.in या डोमेनने समाप्त होतात. com, online, site, in इत्यादी डोमेन असलेल्या कोणत्याही संकेतस्थळांवर नागरिकांनी माहिती भरणे किंवा व्यवहार करणे टाळावे. फसवणूक करणाऱ्यांकडून बहुधा “आपल्या वाहनाचे चलन प्रलंबित आहे, तत्काळ दंड भरा”, “ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड होणार आहे, त्वरित तपासा” अशा स्वरूपाचे धमकीवजा संदेश पाठवून अनधिकृत लिंक देण्यात येतात, याबाबत नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. आरटीओ कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून कोणत्याही परिस्थितीत व्हॉटस्अपद्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी केले आहे. ******

No comments: