03 December, 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

हिंगोली (जिमाका), दि. 03 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ते आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाच्या मागणीअन्वये शासन सेवेमधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी आयोगामार्फत वर्षभर विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. यानुसार सन 2026 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग , विविध विद्यापीठे तसेच इतर परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी होऊन उमेदवारांचे नुकसान होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत सर्व संबंधित संस्थांना पाठविण्यात आली असून आवश्यक ती दक्षता घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे. उमेदवारांना आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षांमध्ये जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हावी यासाठी सादर वेळापत्रकास व्यापक प्रसिध्दी देणे आवश्यक असल्याचे आयोगाच्या अवर सचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. तसेच हे वेळापत्रक व कार्यक्रम सर्व कार्यालयांनी आपल्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. ******

No comments: