07 December, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची हट्टा येथे आकस्मिक भेट

हिंगोली, दि.०७ (जिमाका) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नुकतीच हट्टा परिसरात आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्या या दौऱ्यात त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना, केंद्रीय प्राथमिक कन्या प्रशाला आणि सेतू केंद्र येथे केलेल्या या पाहणीत विविध सेवांची प्रत्यक्ष स्थिती तपासून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार शारदा दळवी, सरपंच दीपक हातागळे, ग्रामपंचायत सदस्य हरी शिंदे, सुनील खाडे, पुष्पक देशमुख, विशाल पवार, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते. यावेळी महा-ई सेवा केंद्र, कृषि सेवा केंद्र, प्राथमिक शाळा आणि हयात नगर येथील महा ई सेवा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सुरुवातीला हट्टा पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली. या भेटीत जनावरांच्या उपचार नोंदी, औषधसाठा, सेवांचा दर्जा आणि दवाखान्याची कार्यपद्धती तपासली. काही बाबींमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे दिसून आल्याने त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले. कन्या प्रशालेतील अध्यापनाची पाहणी यानंतर केंद्रीय प्राथमिक कन्या प्रशालेत भेट देऊन अध्यापन पद्धती, विद्यार्थिनींची उपस्थिती, शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी आणि उपलब्ध भौतिक सुविधांचा आढावा घेण्यात आला. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भर देत शिक्षकांना योग्य मार्गदर्शन केले. सेतू केंद्राला भेट जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी येथील सेतू केंद्राला भेट दिली. यावेळी येथील कामकाजाचा वेग, प्रलंबित केवायसी अर्जांची स्थिती, तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. *****

No comments: