17 December, 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

हिंगोली (जिमाका), दि. 17 : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असतानाही प्रवेश न मिळालेल्या तसेच निवास, भोजन व इतर सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ न शकणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध स्तरावरील महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम थेट आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी या योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. तसेच भरलेल्या अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करावी. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले आहे. ****

No comments: