16 December, 2025

वाचक सभासद नोंदणी अभियानाचा सर्वांनी लाभ घ्यावा – ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

हिंगोली (जिमाका), दि. 16 : येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक 15 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत वाचक सभासद नोंदणी अभियान व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. गाडेकर यांनी वाचकांनी मोठ्या प्रमाणात या अभियानाचा लाभ घ्यावा तसेच विशेषतः बालवाचकांनी ग्रंथालयाचा नियमित वापर करावा, असे आवाहन केले. वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी शासकीय ग्रंथालये महत्त्वाची भूमिका बजावत असून अधिकाधिक नागरिकांनी ग्रंथालयाचे सभासद व्हावे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी प्रस्तावित शासकीय जिल्हा ग्रंथालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील मुटकुळे, उपअभियंता अमोल इढोळे, कनिष्ठ अभियंता, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, राज्य ग्रंथालय निरीक्षक प्रताप सूर्यवंशी, मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, गजानन शिंदे, संतोष ससे, प्रभाकर पेडणेकर, मिलिंद सोनकांबळे, शंभुनाथ दुभळकर तसेच वाचक व ग्रंथालय पदाधिकारी उपस्थित होते. हे ग्रंथप्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरू नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे सर्वांसाठी खुले असून सर्व नागरिकांनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा तसेच शासकीय ग्रंथालयाचे वाचक सभासद व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे. *****

No comments: