22 December, 2025

अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणातील जप्त वाहनांचा जाहीर लिलाव

हिंगोली (जिमाका), दि. 22: स्टोन क्रशर खदानीमधून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या जंगम मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात जप्त वाहने सोडविण्याबाबत संबंधित कसूरदारांना वारंवार कळवूनही दंडाची रक्कम शासनाकडे जमा करण्यात आलेली नाही. तसेच जप्त केलेली जंगम मालमत्ता सोडविण्यासाठी संबंधित मालक पुढे न आल्याने एकूण सहा खदानधारकांकडील जे.सी.बी., क्रशर मशीन व इतर वाहने जाहीर लिलावाद्वारे विक्रीस काढण्यात येत आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली यांच्याकडील दि. 19 डिसेंबर 2025 च्या पत्रानुसार या जंगम मालमत्तेची लघुत्तम किंमत निश्चित करण्यात आली असून, त्यानुसार अटी व शर्तींच्या अधीन राहून जाहीर लिलावाची नोटीस देण्यात आली आहे. या जंगम मालमत्तेचा जाहीर लिलाव दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत महसूल मंडळ बासंबा, भांडेगाव, डिग्रस कऱ्हाळे अंतर्गत असलेल्या स्टोन क्रशर खदानींच्या ठिकाणी बोली पद्धतीने होणार आहे. इच्छुकांनी लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तहसील कार्यालय, हिंगोली येथील गौण खनिज विभागात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज व प्रती वाहन रुपये 10 हजार अनामत रक्कम सादर करणे बंधनकारक राहील. ज्या मालकांनी दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत दंडात्मक रक्कम भरली असल्यास त्यांना बंधपत्रावर संबंधित वाहन ताब्यात देण्यात येईल. लिलावात उच्चतम बोली लागलेल्या वाहनांचा ताबा संपूर्ण रक्कम भरल्यानंतर देण्यात येणार असून, वाहन उचलण्याचा व नोंदणीसंबंधीचा सर्व खर्च लिलावधारकाने स्वतः करावयाचा आहे. लिलाव प्रक्रियेसंदर्भात सर्व अधिकार उपविभागीय अधिकारी, हिंगोली व तहसीलदार, हिंगोली यांनी राखून ठेवले असून, आवश्यकतेनुसार अटी व शर्तींमध्ये बदल, लिलाव मंजूर अथवा रद्द करण्याचा अधिकारही प्रशासनाकडे राहणार आहे. वरील सर्व अटी व शर्ती मान्य असलेल्या व्यक्तींनाच लिलावात सहभागी होता येईल, असे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. ******

No comments: