17 December, 2025

वाळू व गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात कठोर कारवाईचे निर्देश

हिंगोली (जिमाका), दि. 17 : वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर व अवैध वाहतूक यांना आळा घालण्यासाठी तसेच राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांच्या कामकाजात समानता व धोरणात्मक एकसूत्रता राहावी, या दृष्टीने राज्य परिवहन प्राधिकरणाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. दि. 26 नोव्हेंबर, 2025 रोजी निर्गमित शासन परिपत्रकान्वये मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 86 मधील तरतुदीनुसार विभागीय कारवाई करण्याचा निर्णय राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांनी घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध, अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करी रोखण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कठोर कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या गुन्ह्यात संबंधित वाहनाचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित करून वाहन अटकावून ठेवण्यात येईल. दुसऱ्या गुन्ह्यात 60 दिवसांसाठी परवाना निलंबित करून वाहन अटकावून ठेवण्यात येईल. तर तिसऱ्या गुन्ह्यात वाहन अटकावून ठेवून संबंधित परवाना रद्द करण्याची कार्यवाही प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित वाहतूकदारांनी गौण खनिजांच्या उत्खनन व वाहतुकीसाठी शासनाची रीतसर परवानगी घेऊनच उत्खनन व वाहतूक करावी. अन्यथा शासन परिपत्रकानुसार वरीलप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे आवाहन वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. ***

No comments: