08 December, 2025

भटक्या श्वानांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची 15 डिसेंबरपर्यंत अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 08 : भटक्या श्वानांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करून त्याचा सविस्तर अहवाल दि. 15 डिसेंबरपर्यंत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. भटक्या श्वानांच्या अनुषंगाने कार्यवाही तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्राणी जन्म नियंत्रण नियम, 2023 प्रभावीपणे राबविण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. बालाजी भाकरे, नगर पालिका प्रशासनाचे आश्विन माने तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी भटक्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण व जंतनिर्मूलन करावे. भटक्या श्वानांसाठी निवारे व आश्रयस्थाने उपलब्ध करून देणे तसेच त्यांना खाण्यासाठी निश्चित जागा ठरविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये अँटी-रेबीज लस व इम्युनोग्लोबुलिनचा आवश्यक साठा उपलब्ध राहील, यासाठी समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. भटक्या श्वानांबाबत तक्रारींच्या निवारणासाठी नगरपालिका व नगरपंचायत स्तरावर स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक विकसित करून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शैक्षणिक संस्था, सार्वजनिक व खासगी रुग्णालये, क्रीडा संकुल, बसस्थानके व रेल्वे स्थानक परिसरात आढळणाऱ्या भटक्या श्वानांना तात्काळ पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करून नियुक्त निवाऱ्यांमध्ये हलविण्यात यावे. अशा भटक्या श्वानांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. सर्व संबंधित यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचा एकत्रित अहवाल दि. 15 डिसेंबरपर्यंत सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिले. *******

No comments: