09 December, 2025
खरीप व रब्बी 2024 मधील पिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सक्षम प्रशासकीय नेतृत्वाखाली व जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी समन्वयामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2024 व रब्बी हंगाम 2024-25 साठी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे.
या दोन हंगामांसाठी जिल्ह्यास 297 कोटी 50 लाख रुपयांची पिकविमा नुकसान भरपाई मंजूर झाली असून ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिक नुकसानीनंतर एचडीएफसी इआरजीओ विमा कंपनीमार्फत ही आर्थिक मदत वेळेत वितरित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पिकविमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वेळोवेळी आढावा बैठका घेऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या सूचनेनुसार पीक नुकसानीची माहिती तातडीने विमा कंपनीकडे सादर करून नुकसान भरपाईचे वितरण वेळेत पूर्ण करण्यात आले.
हंगामनिहाय सहभाग व विमा संरक्षण :
खरीप हंगाम 2024 मध्ये 4.72 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन 1661 कोटी रुपयांचा विमा संरक्षित केला होता, तर रब्बी हंगाम 2024 मध्ये 1.35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून 415 कोटी रुपये रकमेचा विमा संरक्षित केला आहे.
नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीनंतर एचडीएफसी इआरजीओ विमा कंपनीद्वारे हंगामनिहाय भरपाईची रक्कम वितरीत करण्यात येत आहे. यामध्ये खरीप 2024 यासाठी 195.45 कोटी रुपये, रब्बी 2024-25 साठी 102.05 कोटी रुपये अशी एकूण 297 कोटी 50 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. ही भरपाई रक्कम जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रातील अनिश्चिततेत मोठा आर्थिक आधार ठरली आहे.
प्रलंबित भरपाईबाबत सूचना :
खरीप व रब्बी हंगामातील मिळून एकूण 1 कोटी 37 लाख रुपयाची रक्कम विविध तांत्रिक कारणांमुळे (जसे की एक हजार रुपयांपेक्षा कमी दावे, केवायसी अपूर्ण असणे, खाते बंद असणे इ.) प्रलंबित आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीने तात्काळ संबंधित लाभार्थ्यांशी संपर्क साधून बँक तपशील व केवायसी अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून उर्वरित रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली आहे.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment