04 December, 2025
जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• महिला व बाल विकास विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 04 : जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 नुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा कृती दल, प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व, बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल व बाल कल्याण समिती यांची त्रैमासिक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विविध योजनांची अंमलबजावणी, जनजागृती उपक्रम आणि बाल संरक्षण कार्याचा विस्तृत अहवाल सादर करण्यात आला.
या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले की, जिल्ह्यात निवडलेल्या 45 हॉटस्पॉट गावांमध्ये बालविवाह पूर्णपणे थांबवण्यासाठी ग्रामपंचायत व धार्मिक स्थळांच्या भिंतीवर जनजागृती संदेश आणि 1098 चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकाचे प्रसारण करावे. आरोग्य विभागाच्या तपासणीत आढळलेल्या 81 किशोरवयीन मातांचे सर्वेक्षण करून त्यांच्या विवाहांची सखोल माहिती गोळा करावी तसेच संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाई करावी.
किशोर मातांचे समुपदेशन करून शिक्षणाच्या प्रवाहात पुनर्वसन करणे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे, आवश्यक प्रशिक्षण देणे आणि त्यांना सक्षम करण्यासाठी कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आरोग्य विभागाने सर्व किशोरवयीन मातांचा तपशीलवार विदा (डेटा) तयार करावा तसेच प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समितीमार्फत विवाहांची अनिवार्य नोंदणी सुनिश्चित करावी. बालविवाह प्रतिबंधासाठी मुलींचा जन्मापासून विवाहापर्यंतचा संपूर्ण विदा तयार करण्याची कार्यपद्धती निश्चित करावी. जागतिक बालिका दिनानिमित्त सर्व शाळांमधील विद्यार्थिनींकडून ‘बालविवाह करू नका’ असा भावनिक संदेश असलेली पत्रे वडिलांना लिहिण्याचा उपक्रम राबवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
बैठकीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि सदस्य सचिव एस.आर. दरपलवार यांनी विविध पोर्टलवरील (मिशन वात्सल्य, एनसीपीसीआर, घर पोर्टल, पीएम केअर्स, गती शक्ती, केअरींग पोर्टल) माहिती भरण्याची सद्यस्थिती, प्रायोजकत्व व प्रतिपालकत्व योजना, बालविवाह निर्मूलन उपक्रम आणि चाईल्ड हेल्पलाईन (1098) कामकाजाचा आढावा सादर केला.
या बैठकीस डॉ. बालाजी भाकरे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजाडे, युनिसेफचे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बाळू राठोड, प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुधाकर इंगोले, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत, चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, प्रा. किशोर इंगोले व अन्य कर्मचारी, समितीचे सदस्य उपस्थित होते.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment