16 December, 2025

विशेष शिबिराचे आयोजन करुन ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 16 : शेतकरी ओळख क्रमांक (ॲग्रीस्टॅक) निर्मितीबाबत व्यापक प्रचार-प्रसिद्धी करुन विशेष धडक मोहीम राबवावी तसेच प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. यासाठी क्षेत्रीय स्तरावर जनजागृती मोहीम राबवून ॲग्रीस्टॅक पोर्टलवर पीएम किसान लाभार्थ्यांपैकी नोंदणी न झालेल्यांची यादी काढून ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करावी. नेमपॅच स्कोअरशी संबंधित प्रलंबित प्रकरणेही तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गावनिहाय विशेष शिबिरे आयोजित करुन ॲग्रीस्टॅक नोंदणी, अतिवृष्टी अनुदान, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना यासह इतर योजनांचे ई-केवायसी तात्काळ पूर्ण करावेत. या शिबिरांना तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहून प्रलंबित ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी पूर्ण करावी. याबाबत शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात येणार असून सर्वांनी परिपूर्ण माहितीसह उपस्थित राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी आयोजित ऑनलाईन बैठकीत दिले. पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत-जिल्हाधिकारी दरम्यान, पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणाबाबतही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. पाणंद रस्त्यांबाबत निर्णय झालेल्या ९९ शेतरस्त्यांचे मजबुतीकरण व दुतर्फा वृक्ष लागवड तातडीने करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. यासाठी लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन त्यांच्या निधीतून, १५ वा वित्त आयोग निधी, जनसुविधा व नागरी सुविधा निधीचा वापर करावा. आदिवासी बहुल गावांतील पाणंद रस्त्यांची कामे आदिवासी उपयोजनेंतर्गत करावीत. उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर बैठका घेऊन कामाचे नियोजन करावे तसेच कामासाठी योग्य कंत्राटदारांची निवड करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. या ऑनलाईन बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते. ******

No comments: