05 December, 2025
जिल्ह्यात संविधान अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 05 : भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने 26 नोव्हेंबर 2025 पासून पुढील प्रत्येक वर्षी संविधान अमृत महोत्सव– घर घर संविधान अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे वार्षिक वेळापत्रक तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व विभागांना दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, ग्रामपंचायती, सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, वसतिगृहे व वाचनालयांमध्ये 26 नोव्हेंबरपासून संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार असून ‘आपले संविधान – आपला आत्मसन्मान’ या उपक्रमांतर्गत संविधान सेल्फी स्टँड उभारले जातील. कर्मचारी व विद्यार्थी यांनी या स्टँडसमोर सेल्फी घेऊन अपलोड करणे बंधनकारक राहील. सर्व कार्यक्रमांची सुरुवात संविधान प्रास्ताविकेच्या वाचनानेच केली जाईल.
शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान जनजागृती
शाळा, महाविद्यालये व वसतिगृहात दररोज प्रार्थनेत संविधान प्रास्ताविका वाचन, विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत हक्क, कर्तव्ये व मूल्यांची ओळख करून देण्यासाठी शिक्षक व अधीक्षकांचे मार्गदर्शन, संविधानातील महत्वाच्या कलमांची माहिती सोप्या भाषेत देणे.
हिंगोली जिल्ह्यात संविधान दिनानिमित्त संविधान यात्रा व प्रभात फेरी, पोलीस, स्काऊट-गाईड, होमगार्ड संचलन, संविधान पथनाट्य, चित्रप्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, संविधानावर आधारित प्रश्नमंजूषा, निबंध, भाषण, वेशभूषा, काव्यवाचन, चित्रकला इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.
तसेच वॉक फॉर संविधान, संविधान तज्ज्ञांची व्याख्याने आणि दोन दिवसीय संविधान सन्मान क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. विशेष दिनानिमित्त वर्षभर संविधान मूल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
वर्षभर साजरे होणारे विशेष दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (6 डिसेंबर)पासून ते संविधान दिन (26 नोव्हेंबर) आदी वर्षभरात येणा-या सर्व दिनविशेषांवर संविधान प्रसारासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन व सादरीकरण होणार आहे. यामध्ये संविधानावर आधारित गाणी, देशभक्तीपर गाणी, संविधान प्रसार नाटक, नृत्य इत्यादी उपक्रम राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
तालुका प्रशासन व पोलीस विभागाचे उपक्रम
प्रत्येक तालुक्यात तहसीलदारामार्फत वर्षातून दोन वेळा संविधान संमेलन, पालखी मिरवणूक व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. पोलीस स्टेशन स्तरावर सात दिवसांचा संविधान सप्ताह, प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन, व्याख्याने, रक्तदान शिबिर, पथनाट्य, वॉक फॉर संविधान, निर्भया पथक व पोलीस अधिकारी शाळा–महाविद्यालयांत भेट देऊन संविधान प्रसार करतील.
आरोग्य विभागाचे उपक्रम
शासकीय, धर्मादाय, महात्मा फुले जन आरोग्य योजना अंगीकृत रुग्णालयांनी महिन्यातून दोनदा ग्रामपंचायतीसमोर व अनुसूचित जाती-जमाती वस्त्यांमध्ये आरोग्य निदान शिबिरे आयोजित करणे अनिवार्य राहील. या शिबिरांचे अहवाल जिल्हाधिकारी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त व जिल्हा शल्यचिकित्सक यांना पाठवावे लागणार आहेत.
वृक्षारोपण आणि जनजागृती मोहीम
कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम, परिवहन विभागामार्फत वर्षातून दोन वेळा वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येईल. तसेच प्रत्येक विभागाने महिन्याच्या वेळापत्रकानुसार संविधान प्रसाराचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
'बार्टी'मार्फत पुस्तके उपलब्ध
बार्टी संस्थेमार्फत संविधान पुस्तिका व महापुरुषांची पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यक्रमस्थळी पुस्तक स्टॉल लावण्यात येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
समन्वय व निरीक्षण
गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून ते नियमित बैठका घेऊन कार्यक्रमांची अंमलबजावणी करतील.
उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती, बार्टीचे तालुका समन्वयक व समतादूत दरमहा भेट देऊन उपक्रमांचा आढावा घेतील आणि अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील.
सर्व उपक्रमांचे मूल्यमापन संबंधित अधिकारी–कर्मचारी यांच्या वार्षिक गोपनीय अहवालात नोंदवले जाईल. तसेच कसूर आढळल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यालयांनी आपल्या कार्यक्रमांची माहिती व कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा तसेच अधिकृत जिल्हा संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक राहील, अशी माहिती समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment