18 December, 2025

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५’चे विमोचन

हिंगोली (जिमाका), दि. १८ : जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत वर्ष २०२५ करिता सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सर्व घटकनिहाय सांख्यिकी माहिती समाविष्ट असलेले “जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५” हे पुस्तक तयार करण्यात आले असून, या पुस्तकाचे विमोचन आज विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक एस. एम. रचावाड, उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजूषा मुथा, प्रगती चौंडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत दरवर्षी हिंगोली जिल्ह्याचा समग्र आढावा सादर करणारे हे प्रकाशन प्रसिद्ध करण्यात येते. या प्रकाशनामध्ये जिल्ह्याची दृष्टीक्षेपात माहिती, निवडक निर्देशांक, जिल्हा उत्पन्न, कृषी, जलसंपदा, वने, उद्योग, सहकार, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, ऊर्जा, जिल्हा वार्षिक योजना तसेच विविध विकास योजनांबाबत सविस्तर सांख्यिकी तक्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील कला व संस्कृती, यात्रा, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव, पर्यटन याविषयी विशेष माहिती देण्यात आली असून, नव्याने स्थापन झालेले हळद संशोधन केंद्र तसेच लिगो-इंडिया प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती या प्रकाशनामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. हे प्रकाशन जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करताना शासनाच्या विविध विभागांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्वांगीण व तपशीलवार आकडेवारी उपलब्ध करून देणारे ठरणार असून, संशोधक व विद्यार्थ्यांसाठीही ते उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सदर प्रकाशन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या www.mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “प्रकाशन” या शीर्षकाखाली पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असून, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक एस. एम. रचावाड यांनी केले आहे. यावेळी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, सहायक संशोधन अधिकारी ए. ए. करेवार तसेच सांख्यिकी सहायक निशा नवले उपस्थित होते. *****

No comments: