30 December, 2025
इलेक्ट्रॉनिक काट्यांच्या पडताळणीची मुदत 12 महिनेच-वैध मापनशास्त्र विभागाचे स्पष्टीकरण
हिंगोली (जिमाका), दि. 30 : “व्यापारी बंधूसाठी महत्त्वाचे” या मथळ्याखाली प्रसारित झालेल्या एका प्रेसनोट /व्हाट्सअप मॅसेजमध्ये मोजमाप उपकरणांची पडताळणीची मुदत 24 महिन्यांसाठी एकसमान करण्यात आल्याचा मजकूर प्रसिद्ध झाला आहे. मात्र, या संदर्भात व्यापा-यांमध्ये गैरसमज पसरत असल्याने वैध मापनशास्त्र विभागाने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.
केंद्र शासनाच्या ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार वैध मापनशास्त्र (सामान्य) नियम, 2011 मधील नियम 27 (2) (क) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
या सुधारणेनुसार 18 डिसेंबर 2025 पूर्वी सर्व वजने, धारिता मापे, लांबी मोजमापे, टेप, बीम स्केल व काउंटर मशिन यांची पडताळणी मुदत 24 महिने होती. 18 डिसेंबर 2025 नंतरच्या सुधारित नियमांमध्ये याच यादीत इंधन डिस्पेंसर (पेट्रोल व डिझेल) यांचाही समावेश करण्यात आला असून, त्यांचीही पडताळणी मुदत 24 महिने करण्यात आली आहे.
मात्र, या अधिसूचनेनुसार 24 महिने वैधता असलेली उपकरणे ही केवळ यांत्रिक (मेकॅनिकल) स्वरूपाची असून त्यामध्ये वजने, धारिता मापे, लांबी मोजमापे (मीटरपट्टी), लांबी मोजण्याचे टेप, बीम स्केल (दांडीचा तराजू), काउंटर मशिन आणि त्यात नव्याने समाविष्ट केलेले इंधन डिस्पेंसर (पेट्रोल व डिझेल) यांचाच समावेश आहे.
यामुळे इलेक्ट्रॉनिक काट्यांच्या पडताळणीची मुदतही 24 महिने झाली असा समज काही व्यापा-यांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र, वैध मापनशास्त्र विभागाच्या उपनियंत्रकांनी स्पष्ट केले आहे की इलेक्ट्रॉनिक काट्यांच्या पडताळणीची मुदत ही 12 महिने (1 वर्ष) इतकीच असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
सर्व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वैध मापनशास्त्र विभागाकडून करण्यात आले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment