09 December, 2025

दिव्यांग विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 9 : दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ऑनलाईन बैठकीत सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी भाकरे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी गीता गुठ्ठे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व तहसीलदार ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी 5 टक्के दिव्यांग राखीव निधीबाबत करण्यात आलेली कार्यवाही, सुगम इमारत, दिव्यांग छळ प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी, सर्व आस्थापनांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारकांवर केलेली कारवाई, दिव्यांग व्यक्तींना रेशन कार्ड वाटप, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांगांसाठी वाढीव अनुदान तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील एक टक्का निधी खर्च आदी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांनी सुगम इमारतींच्या अनुषंगाने शासकीय इमारतींचे क्रमांकन (रँकिंग) निश्चित करून त्याचा सविस्तर अहवाल शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच अपंग पुनर्वसन केंद्राच्या इमारतीची सद्यस्थिती, सुविधा व आवश्यकता यांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ वेळेत व पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून जबाबदारीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले. *******

No comments: