23 December, 2025
जिल्हा सामान्य रुग्णालय व आरोग्य संस्थांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट
हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग (एनआयसीयू), डायलेसिस युनिट यासह विविध विभागांना भेट देऊन रुग्णालयातील उपलब्ध सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णसेवा अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण व वेळेत मिळावी यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी नव्याने बांधण्यात येत असलेल्या स्त्री रुग्णालयास भेट देऊन सुरू असलेल्या बांधकामाची सद्यस्थिती व प्रगतीचा आढावा घेतला. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित इमारतीच्या कामाची पाहणी करून नियोजन व पुढील कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या पाहणीदरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे, डॉ. नितीन पुरोहित, डॉ. सचिन बोधगिरे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील सोयी-सुविधा, कामकाज व सेवा वितरणाचा आढावा घेतला. फाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व विभागांची पाहणी करून एनक्वास (NQAS) मानांकनाच्या अनुषंगाने कामकाजाची तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता, सेवा गुणवत्ता व रुग्णसेवेबाबत समाधान व्यक्त करून त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणखी काही नवीन उपकरणे व सुविधा आवश्यक असल्यास त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सोलार सिस्टीम, आरओ पाणी फिल्टर, डिलिव्हरी टेबल, रुग्णवाहिका शेड, पार्किंग शेड तसेच डिजिटल इमर्जन्सी ड्रग सुविधांसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या लाभार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून दिल्या जात असलेल्या उत्तम आरोग्य सेवेबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपाली पतंगे, डॉ. गायकवाड तसेच इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या पाहणीप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपाली पतंगे, डॉ. गायकवाड, शाळेतील शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)






No comments:
Post a Comment