29 December, 2025
बालविवाहमुक्त भारत उपक्रमांतर्गत पांडुरंग माध्यमिक विद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रम
हिंगोली (जिमाका), दि. 29: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यात “बालविवाह मुक्त भारत” या उपक्रमांतर्गत हिंगोली तालुक्यातील समगा येथील पांडुरंग माध्यमिक विद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांकडून बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम, संबंधित कायदेशीर तरतुदी तसेच मुला-मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे समुपदेशक अंकुर पाटोडे व केसवर्कर सुरज इंगळे उपस्थित होते. त्यांनी बालविवाहासंदर्भात तक्रार नोंदविण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकाची माहिती दिली तसेच गरजू बालकांना तत्काळ मदत उपलब्ध होऊ शकते, असे सांगितले.
याप्रसंगी पांडुरंग माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. डी. नरवाडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद, महिला कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालहक्कांचे संरक्षण, शिक्षणाचे महत्त्व व बालविवाहाविरुद्ध जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment