13 December, 2025
हिंगोली जिल्ह्यात “प्लास्टिक कचरा गावमुक्त अभियान” विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी — मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड
हिंगोली, दि. 13 (जिमाका) :
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हिंगोली जिल्हा परिषदेमार्फत “प्लास्टिक कचरा गावमुक्त अभियान” ही विशेष मोहिम जिल्हाभर राबविण्यात आली. ही मोहीम दिनांक ६ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रभावीपणे राबविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांना या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ५६३ ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टिक कचरा संकलन, प्लास्टिक वापराविरोधात जनजागृती तसेच श्रमदान उपक्रम राबविण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या रॅली, स्वच्छता फेऱ्या तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आले. या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पंचायत समिती स्तरावर सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, कृषी गट, युवक मंडळे तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातून आरोग्य व स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. ग्रामस्थांना गावातील प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा नियमित वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी या अभियानाचा समारोप करण्यात आला. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्यात आली, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment