11 December, 2025

कळमनुरी तालुक्यातील विकास कामांची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पाहणी

हिंगोली (जिमाका), दि. 11 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दि. 10 डिसेंबर रोजी कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा, माळधामणी, सोडेगाव व उमरा या गावांना भेट देऊन विविध विकास कामांची सविस्तर पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, तहसीलदार जीवककुमार कांबळे यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व ग्रामस्थांना आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शनही केले. सेलसुरा येथे स्मार्ट व्हिलेज योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करण्यात आली. ग्रामपंचायतीत नागरिकांशी संवाद साधून स्थानिक समस्यांची माहिती घेण्यात आली. आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद शाळा व स्मशानभूमीची पाहणी तसेच अतिवृष्टी अनुदान ई-केवायसी कॅम्पला भेट देऊन प्रगतीचा आढावा घेण्यात आला. माळधामणी येथे स्मार्ट व्हिलेजअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. नरेगा अंतर्गत तयार करण्यात आलेला गोठा, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतील प्रगतीची पडताळणी, अतिवृष्टी अनुदान ई-केवायसी कॅम्प व ॲग्रीस्टॅक कॅम्पला भेट यांचा समावेश होता. सोडेगाव येथे स्मार्ट व्हिलेजचे काम पाहणी करून अतिवृष्टी अनुदान ई-केवायसी कॅम्पला भेट देण्यात आली. उमरा येथेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्मार्ट व्हिलेज उपक्रमांची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अपेक्षा व अडचणी जाणून घेतल्या तसेच ई-केवायसी कॅम्पची प्रगती तपासली. या दौऱ्यादरम्यान विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. **

No comments: