09 December, 2025

ॲट्रॉसिटी खून प्रकरणातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरीसाठी 15 डिसेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

हिंगोली, दि.9 (जिमाका) : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत नोंदवलेल्या खून प्रकरणांतील मृत व्यक्तींच्या कुटुंबातील एका पात्र वारसास गट-क वा गट-ड संवर्गातील शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याची तरतूद असून, यासाठी पात्र पीडितांनी आपली आवश्यक कागदपत्रे 15 डिसेंबर 2025 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती गिता गुठ्ठे यांनी केले आहे. अत्याचारामुळे कुटुंबावर झालेला मानसिक-आर्थिक आघात, तसेच कमावत्या सदस्याच्या मृत्यूनंतर उद्भवलेली आर्थिक असुरक्षितता लक्षात घेता ही योजना कुटुबांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. नियुक्ती प्रक्रियेचा पहिला टप्पा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय दक्षता समितीमार्फत पूर्ण करण्यात येईल. समिती संबंधित खटला, मृत व्यक्तीची कौटुंबिक परिस्थिती आणि पात्रतेचे निकष तपासून शिफारसी समाज कल्याण व आदिवासी विकास विभागांना पाठवेल. उपलब्ध रिक्त पदांच्या आधारावर पात्र वारसास नियुक्ती दिली जाईल. अर्ज सादर करताना वारसाचे वय किमान 18 वर्षे व कमाल 45 वर्षे असावे. मृत व्यक्तीची पत्नी किंवा पती प्रथम पात्र ठरतील. त्यानंतर विवाहित/अविवाहित मुलगा-मुलगी आणि मृत्यूपूर्वी कायदेशीर दत्तक घेतलेली मुले पात्र मानली जातील. मृत व्यक्तीचा मुलगा हयात नसल्यास सून अर्ज करू शकेल. घटस्फोटित, विधवा किंवा परित्यक्ता मुलगी अथवा बहीण पात्र मानली जाईल. मृत व्यक्ती अविवाहित असल्यास भाऊ किंवा बहीण अर्ज करू शकेल, या अटी व शर्तींची पूर्तता करण्याचे आवाहन श्रीमती गुठ्ठे यांनी केले आहे. या नियुक्तीस अंतिम मंजुरी देण्याचा अधिकार पुणे येथील समाज कल्याण आयुक्त कार्यालयास आहे. हिंगोली जिल्ह्यातील पात्र कुटुंबांनी कागदपत्रे 15 डिसेंबर 2025 पूर्वी जमा करावीत. अर्ज करण्यासाठी खालील कार्यालयात प्रत्यक्ष भेट देणे आवश्यक आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली, समाज कल्याण विभागाने सर्व पात्र लाभार्थ्यांना नियत मुदतीत कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. ******

No comments: