10 December, 2025
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 28 डिसेंबर रोजी
हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) इयत्ता 8 वी साठी रविवार, दि. 28 डिसेंबर, 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा राज्यभरात एकूण 758 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातून एकूण 13 हजार 789 शाळांनी सहभाग नोंदविला असून एकूण 2 लाख 50 हजार 544 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळांवर संबंधित शाळांच्या लॉगिनवर दि. 10 डिसेंबर, 2025 पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची राहणार आहे.
प्रवेशपत्रामधील विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यातील स्पेलिंग दुरुस्त करावयाची असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल करता येणार नाही) तसेच जन्मतारीख, जात, आधार क्रमांक इत्यादी बाबींमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिनद्वारे दि. 27 डिसेंबर, 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त टपाल, समक्ष किंवा ई-मेलद्वारे तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या दुरुस्त्यांचा विचार करण्यात येणार नाही. या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर लागू करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी कळविले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment