01 December, 2025
नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी कल्याण मंडप येथे मतदान साहित्याचे वितरण — निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांचे मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 01: आगामी नगरपरिषद निवडणुका पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सर्व तयारी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने नगरपरिषद कल्याण मंडप येथे मतदान केंद्रावर लागणाऱ्या साहित्याचे वितरण करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन देखील देण्यात आले.
या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून साहित्य वितरणाची पाहणी केली. त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत मतदान यंत्रणा, मतदार याद्या, आवश्यक फॉर्म, सील्स, टॅग्ज व इतर साहित्य वेळेवर आणि सुस्थितीत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर सुयोग्य समन्वय, शांतता आणि निष्पक्षता राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यावर भर दिला.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींचे मार्गदर्शन करत होते. मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, तसेच दिव्यांग, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ मतदान सुविधा उपलब्ध ठेवण्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी साहित्याची तपासणी करून आपापल्या मतदान केंद्रांकडे प्रस्थान केले. प्रशासनाकडून सर्व कर्मचाऱ्यांना आचारसंहिता तसेच निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रशासनाच्या तयारीमुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)




No comments:
Post a Comment