31 October, 2025

'वंदे मातरम गीत @150' वर्धापन दिन कार्यक्रम आयोजनाचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

हिंगोली(जिमाका), दि. 31 : वंदे मातरम गिताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त तालुकास्तरीय कार्यक्रम आयोजनाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आढावा घेतला. येत्या 7 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त, शिक्षणाधिकारी (प्राथमिक माध्यमिक), जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना), गटशिक्षणाधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, पुरातत्त्व विभागाचे समन्वयक, जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये, कौशल्य विद्यापीठ व कौशल्य विकास केंद्र, शासकीय, खाजगी माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच महिला बचत गट, गडकिल्ले संवर्धन संस्था व विविध सामाजिक संस्थांतील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. या कालावधीत देशभक्तीपर भाषणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन, सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे विविध कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सर्व विभागांना कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सूचना दिल्या. *******

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ड्रग्ज फ्री अभियानास प्रारंभ

हिंगोली (जिमाका), दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त नशामुक्त भारत अभियान समिती अंतर्गत जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृतीपर अंमली पदार्थ विरोधी अभियानाचा शुभारंभ समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे यांच्या हस्ते हिंगोली येथे करण्यात आला. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त “एक भारत, व्यसनमुक्त भारत” हा संदेश देत अधिकारी, कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते, व्यसनमुक्ती चळवळीचे कार्यकर्ते आदींनी सहभाग घेतला. एकता, शिस्त, आणि व्यसनमुक्त समाज घडवण्याचा दृढ संकल्प करण्यात आला. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदर्शांप्रमाणे समाज एकत्र राहून राष्ट्र निर्मिती आणि व्यसनमुक्तीच्या माध्यमातून आरोग्यदायी व सशक्त भारत निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे यांनी केले. नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी तथा नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक विशाल अग्रवाल यांनी व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित करत युवकांना समाजहितासाठी अंमली पदार्थ विरोधी, तंबाखूमुक्त जीवनशैली, सकारात्मक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच “व्यसनाला नकार-जीवनाला स्वीकार” हा संदेश प्रभावीपणे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त येत्या वर्षभरात जिल्ह्यात व्यसनमुक्ती प्रचार आणि प्रसार करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी सांगितले. याप्रसंगी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य प्रकाशित तंबाखू-तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत नशाबंदी मंडळाच्या कार्यकर्त्या शुभदा सरोदे, मृण्मयी अग्रवाल यांच्या हस्ते पत्रकाचे वितरण करण्यात आले. तसेच अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे, नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी तथा नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक विशाल अग्रवाल, जिल्हाध्यक्ष शुभदा सरोदे, सहशिक्षक परमानंद शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य प्रकाशित तंबाखू-तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत नशाबंदी मंडळाच्या कार्यकर्त्या शुभदा सरोदे, मृण्मयी अग्रवाल यांच्या हस्ते पत्रकाचे वितरण करण्यात आले. तसेच अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. ******

जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकात्मतेची शपथ देण्यात आली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, नायब तहसीलदार संतोष बोथीकर, सी. आर. गोळेगावकर यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. *******

30 October, 2025

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ

1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान केवडिया गुजरात येथे होणाऱ्या भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग मुंबई, दि २८ : 31 ऑक्टोबर 2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी (150 व्या) जयंती वर्षानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत केवडिया, गुजरात येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संचलन कार्यक्रमात यंदा प्रथमच महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ सहभागी होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे या वर्षी “स्वराज्य: एकतेचा धागा” या संकल्पनेवर हा चित्ररथ साकारण्यात आला आहे. या चित्ररथात अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान असल्याचे दर्शन घडते. त्यांच्या मागे वारकरी संप्रदायातील वारकरी यांची मूर्ती तर पार्श्वभूमीवर मराठा आरमारातील प्रसिद्ध गुराब नौका दर्शविण्यात आली आहे. या माध्यमातून राज्याच्या वैभवशाली इतिहासाची आणि एकतेची झलक दर्शविण्यात आली आहे. या चित्ररथासोबत 14 कलाकारांचा चमू सांस्कृतिक सादरीकरण करणार असून, महाराष्ट्राच्या विविधतेतून एकतेचा संदेश देणारे हे सादरीकरण राष्ट्रीय स्तरावर राज्याची सांस्कृतिक ओळख अधोरेखित करेल. तसेच, 1 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भारत पर्व अंतर्गत महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या सांस्कृतिक कार्य विभागांद्वारे संयुक्त सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम 7 -8 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडेल. महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमात राज्यातील समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविण्यासाठी गोंधळ नृत्य, कोळी नृत्य, लावणी, तसेच वारी परंपरेवर आधारित सादरीकरणे यांचा समावेश असलेले सुमारे 15 ते 20 कलाकारांचे पथक सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आहे या उपक्रमांद्वारे महाराष्ट्र राज्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरेचे वैभव राष्ट्रीय तसेच आंतरराज्यीय पातळीवर प्रभावीपणे सादर होणार आहे. ०००० संजय ओरके/विसंअ

विशेष लेख : सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ विशेष स्वरूपात साजरा होणार !

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी त्यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने हा दिवस भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. हा दिवस भारताच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकजुटतेचे प्रतीक असून, ५६२ संस्थान एकत्रित येऊन आधुनिक भारताची पायाभरणी करणाऱ्या सरदार पटेलांच्या अद्वितीय कार्याला अभिवादन करणार आहे. एकतानगर येथे भव्य परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम या वर्षीचा उत्सव नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धीचा संगम असणाऱ्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर येथे आयोजित केला जाणार आहे. हे ठिकाण “विविधतेत एकता” या भारताच्या संकल्पनेचे प्रतीक म्हणून निवडले गेले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल राज्य पोलीस दल आणि राष्ट्रीय कॅडेट कोर यांच्या सहभागाने भव्य परेड आणि सांस्कृतिक उत्सव आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय कॅडेट्स कोर आणि शालेय बँड यांचे सादरीकरण या परेडमध्ये सीमा सुरक्षा बल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, भारत- तिबेट सीमा पोलीस, सशस्त्र सीमा बल तसेच आसाम, त्रिपुरा, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या पोलीस दलांचा सहभाग असेल. घोडदळ आणि उंटदळाचे संच, स्वदेशी जातींच्या श्वानांचे कौशल्य प्रदर्शन, मार्शल आर्ट सादरीकरणे आणि शस्त्रविरहित युद्धकौशल्याची प्रात्यक्षिके या परेडची शोभा वाढवतील. महिला सक्षमीकरणावर विशेष भर देत, प्रधानमंत्री यांना दिल्या जाणाऱ्या गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्व एक महिला अधिकारी करतील. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव बल च्या महिला कर्मचाऱ्यांकडून मार्शल आर्ट आणि युद्धकौशल्याचे प्रभावी प्रदर्शन सादर केले जाईल. याद्वारे त्यांचे शौर्य, शिस्त आणि आत्मविश्वास प्रकट होईल. राष्ट्रीय सुरक्षेत विशेष योगदान दिले आहे असे रामपूर हाउंड आणि मुधोल हाउंड हे स्वदेशी श्वान आपली कौशल्ये सादर करतील. विशेष म्हणजे, अखिल भारतीय पोलीस श्वान स्पर्धेत विजेती ठरलेली ‘मुधोल हाउंड रिया’ या वर्षीच्या परेडमध्ये डॉग स्क्वाडचे नेतृत्व करेल. याशिवाय, गुजरात पोलिसांचे घोडदळ, आसाम पोलिसांचा मोटरसायकल डेअरडेव्हिल शो, सीमा सुरक्षा बल चे उंटदळ आणि उंट बँड, तसेच एनसीसी कॅडेट्स आणि शालेय बँड “एकतेतच शक्ती आहे” हा संदेश देत परेडमध्ये सहभाग घेतील. भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण पथकाकडून सादर होणारा भव्य एअर शो या परेडच्या भव्यतेत आणखी भर घालेल. "विविधतेत एकता" संदेश देणारे संचलन राष्ट्रीय एकता दिनी परेडमध्ये विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांचे संचालन ‘विविधतेत एकता’ या विषयाचे दर्शन घडवतील. या संचालनात राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, अंदमान-निकोबार बेटे, मणिपूर, महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड आणि पुद्दुचेरी यांच्या संचालनाचा समावेश असेल. यासह सीमा सुरक्षा बल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, सशस्त्र सीमा बल, दिल्ली पोलीस आणि विविध राज्य पोलीस दलांचे ब्रास बँड कार्यक्रमाच्या उत्सवी वातावरणात अधिक रंग भरतील. या परेडमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल चे पाच शौर्यचक्र विजेते आणि सीमा सुरक्षा बल चे १६ वीरता पदक विजेते सन्मानित केले जातील. या शूर जवानांनी नक्षलविरोधी आणि दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये, तसेच पश्चिम सीमेवरील ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान, अद्वितीय धैर्य आणि पराक्रमाचे प्रदर्शन घडविले आहे. परेडसोबतच भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाद्वारे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ९०० कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्यांचे सादरीकरण करतील, ज्यातून भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विविधतेतील सौंदर्य अधोरेखित होईल. राष्ट्रीय एकता दिनाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता, सौहार्द आणि देशभक्तीची भावना दृढ करणे हे आहे. हा उत्सव प्रत्येक भारतीयाला या मूल्यांचा स्वीकार करण्यासाठी आणि देशाच्या ऐक्याच्या भावनेला बळ देण्यासाठी प्रेरित करतो. १ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एकतानगर येथे ‘भारत पर्व’ आयोजित करण्यात येईल. या पर्वात संपूर्ण भारतातील सांस्कृतिक सादरीकरणे आणि खाद्य महोत्सव आयोजित केला जाईल, ज्यामध्ये देशाच्या विविध परंपरांचा संगम पाहायला मिळेल. या पर्वाचा समारोप १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करून केला जाईल. 0000 - वर्षा फडके-आंधळे उपसंचालक (वृत्त)

विशेष लेख : भारताची स्टील फ्रेम – अखिल भारतीय सेवा आणि राष्ट्रनिर्माण

एखाद्या राष्ट्राचे मूल्यमापन केवळ त्याच्या भूगोलाने नव्हे तर त्याच्या संस्थांची कार्यक्षमता, निष्पक्षता आणि लवचिकतेने केली जाते. स्वातंत्र्योत्तर भारतात, अखिल भारतीय सेवा (आयएएस, आयपीएस आणि आयएफओएस) या प्रशासनाच्या कण्याप्रमाणे कार्य करत आहेत, या सेवांनी केंद्र आणि राज्यांमधील सुसंवाद सुनिश्चित केला आणि शासन व नागरिक यांच्यातील दुवा साधला. या सेवांचे वेगवेगळ्या क्षेत्रात केलेले योगदान हे दर्शवते की सरदार वल्लभभाई पटेल यांची दृष्टी आजही एका मजबूत, एकसंघ आणि प्रतिसादक्षम राष्ट्राच्या कार्यपद्धतीस दिशा देणारी आहे. स्टील फ्रेमचा जन्म स्वातंत्र्यानंतरच्या राष्ट्राची स्थिती ओळखून, सरदार वल्लभभाई पटेल यांनी व्यावसायिक, निष्पक्ष आणि कार्यक्षम नागरी सेवांची आवश्यकता अधोरेखित केली. हीच “स्टील फ्रेम” केंद्राला विविध राज्यांशी जोडेल, धोरणांची समतोल अंमलबजावणी करेल आणि कायदा व सुव्यवस्था राखून आर्थिक व सामाजिक विकासाला चालना देईल. हे निक्षून सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल यांना ठाऊक होते की केवळ राजकीय एकता पुरेशी नाही; मजबूत संस्था हाच तत्त्वांना व्यवहारात उतरवण्याचा आणि शांतता व प्रगती टिकवून ठेवण्याचा पाया आहे. प्रशासकीय एकसंधता आणि स्थैर्य अखिल भारतीय सेवांचे अधिकारी धोरणे आणि जनतेमधील कार्यक्षम दुवा म्हणून देशभरातील जिल्ह्यांमध्ये आणि राज्यांमध्ये कार्यरत असतात, निवडणुका पार पाडणे, सामाजिक कल्याण योजना राबविणे, कायद्याचे राज्य आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवणे या सर्व कार्यांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. प्रत्येक जिल्ह्यात त्यांची उपस्थिती शासनाला केवळ शहरी केंद्रांपुरते मर्यादित ठेवत नाही, तर प्रत्येक नागरिकाला राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासात सहभागी बनवते. अनेक भागांमध्ये अधिकारी आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक नियोजन आणि सामाजिक उपक्रमांमध्येही नेतृत्व करतात, ज्यातून या “स्टील फ्रेम”चा बहुआयामी प्रभाव दिसतो. संकट व्यवस्थापन आणि राष्ट्रनिर्माण नैसर्गिक आपत्ती असो, सामाजिक अशांतता असो किंवा महामारी, अखिल भारतीय सेवांचे अधिकारी धोरणे आणि योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीत सातत्य, समन्वय आणि नेतृत्व प्रदान करतात. केंद्राच्या धोरणांना स्थानिक वास्तवाशी सुसंगत ठेवण्याची त्यांची क्षमता भारताला अंतर्गत आव्हानांचा सामना करण्यास आणि विविधतेत एकता टिकवण्यास सक्षम करते. आसाममधील पुरापासून गुजरातमधील भूकंपापर्यंत, संकट काळातील त्यांचे नेतृत्व समुदायांना स्थिर ठेवते आणि आवश्यक सेवांची सातत्याने पूर्तता सुनिश्चित करते. राष्ट्रीय मूल्यांची रुजवण प्रशिक्षण, प्रशासन आणि नागरिकांशी दैनंदिन संवादाच्या माध्यमातून, अखिल भारतीय सेवा सामायिक जबाबदारीची आणि राष्ट्रीय ध्येयाची भावना वाढवतात. अधिकारी विविध गटांमध्ये मध्यस्थी करतात, वाद सोडवतात आणि सर्वसमावेशक धोरणे अंमलात आणतात, ज्यामुळे एकात्मता आणि शासनावर विश्वास दृढ होतो. या दैनंदिन कार्यातून सामाजिक सुसंवाद वाढतो, कायद्याचा आदर, न्याय आणि सामायिक उद्दिष्टांची भावना बळकट होते — जी एका एकसंध राष्ट्राची पायाभूत मूल्ये आहेत. अखिल भारतीय सेवा या सरदार पटेल यांच्या या विश्वासाचे जिवंत उदाहरण आहे. मजबूत संस्था हे एकसंघ भारताचे अधिष्ठान आहेत. त्या दृष्टीला कृतीत, धोरणांना व्यवहारात आणि विचारसरणीला राष्ट्रीय एकात्मतेच्या ठोस रूपात परिवर्तित करतात. राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने, राष्ट्रनिर्माणातील त्यांचे योगदान कोणत्याही राजकीय किंवा सांस्कृतिक प्रयत्नाइतकेच महत्त्वाचे आहे. एकात्मता, निष्पक्षता आणि राष्ट्रीय सेवांचे आदर्श देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत राहतील, हे अखिल भारतीय सेवा सुनिश्चित करतात. श्री.राजू धोत्रे, विभागीय संपर्क अधिकारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई -32 0000

विशेष लेख : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’

*राष्ट्रीय एकात्मता वाढवून विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा सोहळा* लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असून ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि ‘भारत पर्व २०२५’ हे या कार्यक्रमाचा भाग आहे. भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलिनीकरण करून देशाची भौगोलिक आणि राजकीय एकता साध्य केली. कणखर निर्णयक्षमता, मुत्सद्देगिरी, नैतिक धैर्य आणि देशप्रेम, राष्ट्रीय एक्य ही त्यांची गुणात्मक वैशिष्ट्ये होती. त्यांच्या धैर्यवान नेतृत्वाने आणि मुत्सद्दी दृष्टिकोनाने भारताच्या अखंडतेचा पाया रचला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुजरातमध्ये उभारलेला १८२ मीटर उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आज जगातील सर्वाधिक उंच पुतळा असून, २०२४-२५ या वर्षात तब्बल ६०.५९ लाख पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. *प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय उत्सव* प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश देशातील युवक, स्वयंसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये राष्ट्रनिर्माणाची भावना जागृत करणे हा आहे. जनभागीदारीद्वारे राष्ट्रनिर्माण करण्यासाठी या उपक्रमाद्वारे युवक, स्वयंसेवक, नागरिक आणि समाजातील सर्व घटकांना राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री यांच्या प्रोत्साहनातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोहपुरूष सरदार पटेल यांच्या कार्याची ओळख युवकांपर्यंत पोहोचावी यासाठी राष्ट्रीय पातळीवर तसेच राज्य पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी करमसाड, अहमदाबाद (सरदार पटेल यांचे जन्मस्थान) येथून सुरू होऊन स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया येथे संपन्न होणार आहे. या प्रवासात युवक, माय भारत स्वयंसेवक, एनएसएस व यंग लीडर्स विविध सामाजिक विकास उपक्रमांमध्ये सहभागी होतील. या मार्गातील गावे, जिल्ह्यांच्या १५० ठिकाणी लोहपुरूष सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सरदार गाथा सत्रांचे आयोजन करण्यात येईल. ज्यामध्ये सरदार पटेल यांच्या प्रेरणादायी कार्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी माय भारत पोर्टलवर https://mybharat.gov.in/pages/unity_march ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या https://mybharat.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध असून, देशातील सर्व युवकांना या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ‘सरदार@150 एकता मोहिमे’त सहभागी होण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे. *भारत पर्व अंतर्गत राज्यात विविध उपक्रम* महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांना लोहपुरुषांच्या विचारांची प्रेरणा मिळून सामाजिक बांधिलकी अधिक बळकट होईल, या विचारातून क्रीडा मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, माय भारत, एनएसएस, एनसीसी तसेच स्थानिक प्रशासन संयुक्तिकरित्या जिल्हास्तरीय पदयात्रा काढणार असून प्रत्येक जिल्ह्यात ८ ते १० कि.मी. अंतराच्या जिल्हास्तरीय पदयात्रा, निबंध आणि वादविवाद स्पर्धा, सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये, नशा मुक्ती भारत प्रतिज्ञा, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, संस्था स्वदेशी मेळावे, आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा, सांस्कृतिक सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक राज्याद्वारे अशा अभिनव स्पर्धा आणि कार्यक्रमांतून देशभर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. *स्वराज्य : एकतेचा धागा* गुजरात येथे राष्ट्रीय संचलनात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यावर्षी स्वराज्य : एकतेचा धागा या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्याच्या वैभवशाली इतिहासाची आणि एकतेची झलक दर्शविण्यात येणार आहे. या चित्ररथासोबत १४ कलाकारांचा चमू सांस्कृतिक सादरीकरण करणार आहे. या महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम ७ आणि ८ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडेल. या सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यातील समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविण्साठी गोंधळ, नृत्य, कोळी नृत्य, लावणी तसेच वारी परंपरेवर आधारित सादरीकरणे यांचा समावेश असलेले १५ ते २० कलाकारांचे पथक सहभागी होणार आहे. या उपक्रमांद्वारे राज्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरेचे वैभव राष्ट्रीय तसेच आंतरराज्यीय पातळीवर प्रभावीपणे सादर होणार आहे. *गुजरातमध्ये भव्य भारत पर्व सोहळा* प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एकता दिनाचा मुख्य भव्य सोहळा गुजरातमधील एकता नगर (जिल्हा नर्मदा) येथे करण्यात येणार आहे. यावेळी भव्य संचलन आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. संचलनादरम्यान सीएपीएफ आणि विविध राज्यांच्या पोलिस तुकड्या त्यांच्या शौर्य, शिस्त आणि कौशल्याचे प्रदर्शन करतील. या संचलनात बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, तसेच महाराष्ट्र, पंजाब, केरळ, जम्मू-काश्मीर, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, ओडिशा, आसाम, त्रिपुरा आणि छत्तीसगड राज्यांच्या पोलीस तुकड्या सहभागी होतील. घोडदळ, उंटदळ, भारतीय श्वानांच्या प्रजाती, तसेच विविध मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कवायतींचे सादरीकरण होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ९०० कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्याद्वारे देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणार आहेत. *‘भारत पर्व’ मधून विविधतेत एकतेचे दर्शन* 1 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या या भव्य सोहळ्यात विविध राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि खाद्य महोत्सवाचा समावेश करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करून या महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात, आपल्या संस्कृतीची समृद्ध विविधता आणि राष्ट्रीय एकतेला उजाळा देणारे 900 कलाकार भारतीय शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत. गुजरात येथे १८०० चौरस मीटर अशा भव्य परिसरात गुजरात शासनाच्या पर्यटन विभागामार्फत सिंगल डोम (जर्मन हँगर स्ट्रक्चर) उभारण्यात येणार आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून प्रदर्शनासाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयांसाठी थीम पॅव्हेलियनसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात येणार आहे. थीम पॅव्हेलियन्साठी हँगर स्ट्रक्चरची उभारणी करण्यात येणार असून प्रत्येक पॅव्हेलियनचे परिमाण पाच मीटर x पाच मीटर इतके असणार आहे. विविध खाद्यपदार्थांचे ४५ तसेच हस्तकला वस्तू प्रदर्शनाचे ५५ असे १०० स्टॉल्स असणार आहेत. हस्तकला वस्तूंचे स्टॉल केंद्र शासनाच्या हस्ततंत्र व हस्तकला विकास आयुक्तालयामार्फत तर पाच स्टॉल हस्तकला आदिवासी विकास विभागामार्फत उभारण्यात येणार आहेत. १०.८ चौरस मीटर परिसरात हे स्टॉल असतील याचे व्यवस्थापन गुजरात सरकारच्या पर्यटन विभागामार्फत केले जाणार आहे. ४५ स्टॉल्स खाद्यपदार्थांसाठी असणार आहेत. यापैकी पाच दालने ही आदिवासी विकास विभागामार्फत उभारण्यात येणार आहेत. तर ३० स्टॉल हे नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट वेंडर ऑफ इंडिया यांच्यामार्फत उभारण्यात येणार असून, उर्वरित पर्यटन विकास विभागामार्फत उभारण्यात येणार आहेत. स्टुडिओ किचनची उभारणी आयएचएम गांधीनगरतर्फे भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या समन्वयाने १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येईल. पर्यटन विभागामार्फत येथे येणाऱ्या वस्तू व खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. पर्यटक आणि सहभागी युवकांना विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, खाद्य पदार्थांचे स्टॉल, विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारे केंद्र उभारून विविधतेत एकतेचे दर्शन या सोहळ्याच्या माध्यमातून घडणार आहे. एक भारत, श्रेष्ठ भारताच्या संकल्पनेला नवा उत्साह ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे एकावेळी दोन राज्ये अशा पद्धतीने भारत पर्व अंतर्गत एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. 0000000 श्रद्धा मेश्राम विभागीय संपर्क अधिकारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई -32

दिव्यांगाना दुर्धर आजारावरील उपचारासाठी अर्थसहाय्य पुरविण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांगाना दुर्धर आजाराच्या उपचारासाठी अर्थसहाय्य या योजनेकरिता जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, हिंगोली यांच्याकडे पंचायत समिती मार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या व ज्यांच्याकडे 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणाऱ्या दिव्यांगांना त्यांच्या आजारावरील उपचारासाठी 25 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे. दुर्धर आजारामध्ये कॅन्सर, मेंदुविकार, क्षयरोग, हृदय शस्रक्रिया, किडनी, यकृत आजार, कुष्ठरोग, अर्धांगवायु, थॅलासिमिया, सिकलसेल, अॅनामिया, डायबिटीस या आजारांचा समावेश आहे. या योजनेच्या लाभाकरिता वैद्यकीय मंडळाचे दिव्यांग प्रमाणपत्र 40 टक्के, युडीआयडी कार्ड, (सन 2015 च्या नंतरचे दिव्यांगाचे ऑनलाईन प्रमाणपत्र असणे अवश्यक), तज्ञ डॉक्टरांचे सन 2025-26 या वर्षात दुर्धर आजारावर उपचार सुरु असल्याचे व खर्चाचे प्रमाणपत्र, ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याचा दाखला, पुरावा, लाभार्थ्यांचे आधार कार्ड, लाभार्थी हा शासकीय सेवेत नसल्याबाबतचे हमीपत्र, लाभार्थ्यांचे स्वतःचे बँक पासबुक झेरॉक्स, यापूर्वी या योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी गटविकास अधिकारी, पंचायत समितीमार्फत दि. 15 नोव्हेंबर, 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी गिता गुट्टे यांनी केले आहे. *******

दिव्यांगानी स्कुटर खरेदीच्या अर्थसहाय्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत

हिंगोली(जिमाका), दि.30 : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यागांना स्कुटर खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य पुरविणे या योजनेकरिता जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, हिंगोली याच्याकडे पंचायत समिती मार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवाशी असणाऱ्या दिव्यांग व्यक्ती ज्याच्याकडे 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी असलेले दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणाऱ्या दिव्यांगांना 50 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेमार्फत दिव्यांगांना स्वतः एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी सुलभता निर्माण होईल. तसेच दिव्यांगांना स्वावलंबी होण्याकरिता मदत होईल. या योजनेच्या लाभासाठी वैद्यकीय मंडळाचे दिव्यांगत्वाचे 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी असलेले प्रमाणपत्र, युडीआयडी कार्ड, ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याचा दाखला, पुरावा, अर्जासोबत रहिवाशी, आधारकार्ड सत्यप्रत, वाहन खरेदीचे अंदाजपत्रक (कोटेशन), लाभार्थ्यांचे बँक पासबुक, लाभार्थी हा शासकीय सेवेत नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र, या योजनेचा यापूर्वी लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र, लाभार्थी मनोविकलांग असल्यास त्याचे पालकत्व प्रमाणपत्र जोडावे, पात्र झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर रक्कम जमा वर्ग झाल्यानंतर स्कुटर खरेदी करणे बंधनकारक असेल, लाभार्थ्याकडे स्वतःचे वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे, खरेदी केलेल्या स्कुटरची आरसी बुक व वाहन खरेदीची पावती सोबत जोडावी, दिव्यांग व्यक्ती हा वय वर्ष 18 पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे. या कागदपत्रांसह नमूद अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मार्फत दि. 15 नोव्हेंबर, 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी गिता गुट्टे यांनी केले आहे. *********

नोंदणीकृत निवासी मदरशांनी पायाभूत सुविधाच्या अनुदानासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 30 : डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत सन 2025-26 या वर्षात नोंदणीकृत निवासी मदरशांचे नवीन प्रस्ताव सादर करावेत. अल्पसंख्यांक विकास विभागाच्या दि. 22 डिसेंबर, 2023 च्या शासन निर्णयानुसार धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणी असलेल्या निवासी मदरशांना 10 लाख रुपयांच्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहेत. तसेच दि. 21 ऑगस्ट, 2024 च्या शासन निर्णयानुसार पायाभूत सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2025-26 या वर्षात अनुदान प्राप्त करण्यासाठी इच्छूक मदरशांना दि. 11 जुलै, 2018 च्या शासन पत्रानुसार व दि. 11 ऑक्टोबर, 2023 च्या शासन निर्णयानुसार विहित केलेली योजनेची कार्यपध्दती, पात्रता, अटी व शर्ती कायम राहतील. दि. 21 ऑगस्ट, 2024 च्या शासन निर्णयात नमूद 12 पायाभूत सोयी-सुविधांसाठी अनुदान प्राप्त करण्यासाठी इच्छूक मदरशांनी दि. 11 ऑक्टोबर, 2013 च्या शासन निर्णयातील विहित नमुन्यातील परिशिष्ट-अ व प्रपत्र 1 ते 5 मध्ये माहिती संगणकीकृत करुन आवश्यक त्या कागदपत्रासह सविस्तर प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दि. 14 नोव्हेंबर, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे. *******

अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल संस्थांकडून पायाभूत सुविधांसाठी 14 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

हिंगोली (जिमाका), दि. 30 : धार्मिक अल्पसंख्यांक बहुल शासनमान्यता प्राप्त खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपरिषद, नगरपालिका शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2025-26 मध्ये राबविण्यात येत आहे. अल्पसंख्यांक विकास विभागाच्या दि. 7 ऑक्टोबर, 2024 च्या शासन निर्णयानुसार धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांना देण्यात येणाऱ्या दोन लाख रुपये अनुदानात वाढ करुन 10 लाख रुपयापर्यंत करण्यात आले आहे. या अनुदानासाठी दि. 7 ऑक्टोबर, 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार विहित केलेली योजनेची कार्यपध्दती, पात्रता, अटी व शर्ती कायम राहतील. तसेच शासन निर्णयात नमूद अनुदान देय असलेल्या पायाभूत सोयी-सुविधांसाठी अनुदान प्राप्त करण्यासाठी इच्छूक शैक्षणिक संस्थांनी विहित नमुन्यातील प्रपत्र-1, प्रपत्र-2, प्रपत्र-3 व प्रपत्र-5 मध्ये माहिती संगणकीकृत करुन शासन निर्णयात नमूद आवश्यक कागदपत्रासह सविस्तर प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दि. 14 नोव्हेंबर, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. त्यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे. ******

29 October, 2025

“अमृत दुर्गोत्सव 2025”: छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना

हिंगोली (जिमाका), दि. 29 : राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत “अमृत दुर्गोत्सव 2025”या राज्यभर साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-दुर्गांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून तो वारसा जनतेपर्यंत पोहोचविणे हा आहे. या अभिनव उपक्रमाअंतर्गत नागरिकांना आपल्या घराच्या अंगणात, गॅलरीत किंवा सोसायटी परिसरात रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी, पन्हाळगड, लोहगड, पद्मदुर्ग, जिंजी, साल्हेर, विजयदुर्ग व खांदेरी या शिवकालीन 12 दुर्गांपैकी कोणताही एक दुर्ग साकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तयार झालेल्या दुर्गासोबत सेल्फी काढून ती www.durgotsav.com या संकेतस्थळावर अपलोड करायची आहे. प्रत्येक सहभागीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिनंदन पत्र देण्यात येणार असून, हा उपक्रम पूर्णपणे लोकसहभागातून राबविण्यात येत आहे. ही स्पर्धा नसून आपल्या संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान साजरा करण्याची संधी आहे. प्रत्येक घराघरात गड-दुर्ग उभे राहावेत, हाच या उपक्रमामागचा हेतू आहे. या माध्यमातून राज्यभरातील नागरिकांमध्ये शिवचरित्राबद्दल आदर, प्रेरणा आणि अभिमान वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांनी “अमृत दुर्गोत्सव 2025”या अनोख्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शौर्य, पराक्रम आणि इतिहासाचा अभिमान साजरा करावा, असे आवाहन अमृतचे संचालक विजय जोशी यांनी केले आहे. *******

'जलयुक्त शिवार'ची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा -- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 29 : 'जलयुक्त शिवार'ची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा मृद व जल संधारण अधिकारी अनिल कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, वन विभाग, तालुका कृषि अधिकारी, पूर्णा पाटबंधारे, जिल्हा परिषद लघुसिंचन तसेच विविध विभागाचे अधिकारी तसेच जयाजी पाईकराव उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रस्तावित गाव आराखड्यानुसार राबविण्यात येणाऱ्या लघु पाटबंधारे तलाव दुरुस्ती, गाळ काढणे, वनतळे, खोल सलग समतल चर, मातीनाला बांध, अनघड दगडी बांधकाम, गॅबीयन बंधारा, सिमेंट नाला बांध, रोपवन, वृक्ष लागवड, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, नाला खोलीकरण, पाझरतलाव दुरुस्ती, केटीवेअर, शेततळे, रिचार्ज शॉफ्ट आदी कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी विभागनिहाय दिलेले उद्दिष्ट, झालेले काम, प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करुन त्याचा अहवाल सादर करावा, असे सांगून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामाचाही आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेचा आढावा घेतला. यावेळी कृषी समृध्दी योजनेतून जिल्हास्तरीय नाविण्यपूर्ण प्रकल्प उभारण्यासाठी हवामान बदलास अनुकूल पीक पद्धती मॉडेल, बायोपचार उत्पादन युनिट, मूरघास उत्पादन युनिट, हळद मूल्यवृद्धीसाठी शीतगृह, जलतारा, जैवकुंपण, करवंद लागवड, केळी निर्यात प्रकल्प उभारण्याबाबत आढावा घेण्यात आला. तसेच प्रधानमंत्री पिक विम्याचे दावे अंतिम करुन पिकविम्याची रक्कम वाटप करण्याची कार्यवाही 15 नोव्हेंबर, 2025 पर्यंत पूर्ण करावी अन्यथा पीक विमा कंपनी व संबंधितावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी अतुल वायसे, पशुसंवर्धन विभागाचे प्रतिनिधी, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. ******

विविध योजनांचे देण्यात आलेले उद्दिष्ट बँकांनी वेळेत पूर्ण करावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

• जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी घेतला विविध बँकांचा आढावा हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्ह्यातील सर्व बँकांनी विविध योजनांमध्ये देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक व जिल्हा प्रतिनिधी यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक सुजित झोडगे व सर्व बँकेचे जिल्हा समन्वयक बैठकीला उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती विमा योजना, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना, किसान क्रेडिट कार्ड, बचतगटांची कर्ज प्रकरणे आदी विविध योजनांसाठी देण्यात आलेले 50 टक्के उद्दिष्ट दि. 4 नोव्हेंबर, 2025 पर्यंत पूर्ण करावेत. तसेच रब्बी पीक कर्जाचे वितरण वेळेत करुन उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले. *****

28 October, 2025

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत, मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली माहिती* मुंबई, दि. 28 : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत 8 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा लाभ 40 लाख शेतकर्‍यांना होतो आहे. आणखी 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. ही मदत पुढच्या 15 दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11 हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आल्याने मदतीसाठी निधीची कुठलीही कमतरता नाही. पुढील 15 दिवसांत ही मदत अतिवृष्टग्रस्त जिल्ह्यातील किमान 90 टक्के शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जशा याद्या मिळाल्या, तसा निधी वितरित करण्यात आला. ज्यांना केवळ दोन हेक्टरसाठी मदत मिळाली आहे, त्यांना पुढील हेक्टरसाठीचे अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, काही शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तर काहींच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत. काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले. या सर्व बाबी तपासून उर्वरित 10 टक्के शेतकर्‍यांपर्यंतही तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुणीही पात्र शेतकरी मदतपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जावू नये, यासाठी ई-केवायसी केली जात आहे. अ‍ॅग्रीस्टॅकचा डेटा राज्य शासनाकडे असून यामध्ये ज्या शेतकर्‍यांची माहिती उपलब्ध आहे. त्यांची पुन्हा ई-केवायसी केली जात नसून सहायता निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. *शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करा: मुख्यमंत्री श्री. फडणवीस* शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यात नोंदणी सुरू केली जात असून यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. अशा नोंदणीमुळे पारदर्शकता आली असून आता शेतकर्‍यांना हमी भाव मिळत आहे. यापूर्वी व्यापारी शेतकर्‍यांकडून कमी दराने माल घेवून शासनाला जास्त दराने विकला जात असे. नोंदणी करून शासकीय खरेदी केंद्रावर किंवा शासनाने जाहीर केलेला हमी भावाप्रमाणे खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनाच मालाची विक्री करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले आहे. ****

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा -जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

• जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गिता गुठ्ठे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत विविध विकास योजनांचे निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव आयपासवर अपलोड करुन तात्काळ सादर करावेत. क्रीडांगण विकास कामासाठी आदर्श शाळाचा समावेश करावा. सरंक्षण भिंतीची आवश्यकता असलेल्या शाळेची यादी द्यावी. तसेच नाविण्यपूर्ण कामाचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. यावेळी मृद व जलसंधारण, दुग्धशाळा विकास, महावितरण, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, मत्स्यव्यवसाय, क्रीडा विभाग, कौशल्य विकास योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता, कृषि विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास, पाटबंधारे, शिक्षण, परिवहन विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. तसेच जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. पीएम अवार्ड व राष्ट्रीय ई-गव्हर्नस अवार्डसाठी सर्व संबंधित विभागाने दिलेल्या निर्देंशांकाची माहिती वेळेत अपलोड करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या. ***

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत दि. 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये जिल्ह्यात तालुकानिहाय विविध शहर व ग्रामीण भागात प्रत्यक्षपणे नागरिकापर्यंत जाऊन भ्रष्टाचार निर्मूलन संबंधाने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच विविध स्पर्धा कार्यक्रम, चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, निबंध स्पर्धा, कार्यशाळा आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. या सप्ताहादरम्यान भ्रष्टाचार संबंधी काही तक्रार असल्यास, तक्रार कशी करावी याबाबतची माहिती जिल्हृयातील विविध शहरी व ग्रामीण भागातील लोकापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे घोषवाक्य असलेली भ्रष्टाचार निर्मूलनाची पत्रके, पॉम्पलेट, भितीपत्रके, बॅनर तयार करण्यात आले असून या माध्यमातून दि. 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत आयोजित दक्षता जनजागृती सप्ताहात कार्यालयाने तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रत्येक दिवशी नागरिकांपर्यंत पोहोचून भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यात येत आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे व अटींचे काटेकोर पालन करुन दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्श्न ब्युरो, नांदेड (मो. 9545531234/ 9226484699), विकास घनवट, पोलीस उपअधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, हिंगोली (मो. 9822259932) व टोल फ्री क्र. 1064, दूरध्वनी क्रमांक 02456-223055 आणि व्हॉट्सअप क्र. 9359128889 / 9422061064) यांना संपर्क साधता येईल, अशी माहिती लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. **

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे 181 कोटी 50 लाख रुपये निधी वितरित करण्यास मान्यता

• थेट खात्यावर 151 कोटी 78 लाख 82 हजार रुपयाचे अनुदान डीबीटीद्वारे जमा • ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी करुन अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले असून आतापर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे 181 कोटी 50 लाख 7 हजार 791 रुपये निधी वितरित करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरुन मान्यता देण्यात आली आहे. तर 1 लाख 97 हजार 98 शेतकऱ्यांच्या खात्यावर 151 कोटी 78 लाख 82 हजार 617 रुपये मदतीचे अनुदान डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. ई-केवायसी अभावी प्रलंबित शेतकरी लाभार्थ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी करुन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. जिल्ह्यात जून ते ऑगस्ट, 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाने हिंगोली जिल्ह्यासाठी 231 कोटी 27 लाख 92 हजार 335 रुपयांची मदत मंजूर केली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट निधी वितरीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसीलदारांनी 2 लाख 37 हजार 873 शेतकऱ्यांना 181 कोटी 50 लाख 7 हजार 791 रुपयांच्या निधी वितरित करण्यासाठीची माहिती संगणक प्रणालीवर भरुन डीबीटीद्वारे निधी वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 97 हजार 98 शेतकऱ्यांच्या खात्यावर 151 कोटी 78 लाख 82 हजार 617 रुपयाची मदत डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आली आहे. ई-केवायसी प्रलंबित असलेल्या 49 हजार 855 शेतकऱ्यांना 35 कोटी 27 लाख 8 हजार 615 रुपयाची मदत ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक नोंदणी केल्यानंतर लगेच वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील 34 हजार 462 शेतकऱ्यांना 28 कोटी 7 लाख 77 हजार 549, वसमत तालुक्यातील 48 हजार 260 शेतकऱ्यांना 31 कोटी 03 लाख 6 हजार 9 रुपये, हिंगोली तालुक्यातील 34 हजार 959 शेतकऱ्यांना 27 कोटी 63 लाख 3 हजार 973 रुपये, कळमनुरी तालुक्यातील 38 हजार 67 शेतकऱ्यांना 33 कोटी 10 लाख 38 हजार 558 आणि सेनगाव तालुक्यातील 41 हजार 350 शेतकऱ्यांना 31 कोटी 94 लाख 56 हजार 527 रुपयाची मदत त्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रलंबित राहिलेले 35 कोटी 27 लाख 8 हजार 615 रुपयाचे अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे. त्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होत आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी नसणाऱ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागत आहे. त्यामुळे सर्व संबंधित शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घेऊन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. **

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लाभाच्या उपक्रमांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

हवामानानुसार पिकांची फेरपालट यांचा समन्वय साधणारा हा प्रकल्प: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्यातील 21 जिल्ह्यांतील 7,201 हून अधिक गावांमध्ये प्रकल्पाची अंमलबजावणी होणार." - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई, दि.२८: हवामान बदलाचे अनेक परिणाम राज्यातील शेतीवर होत असून शेतकरी वर्गाला मोठा फटका बसत आहे. अशा परिस्थितीत बदलत्या हवामानाला तोंड देत शेती अधीक किफायतशीर करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे गरजेचे आहे, म्हणून महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने कृषि विभागाच्या माध्यमातून हवामान अनुकूल शेती विकासाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि शेतकरी गटांना लाभ देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या डीबीटी प्रणालीचे अनावरण करून प्रकल्पातील उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,उद्योगमंत्री उदय सामंत,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषि राज्यमंत्री अॅड आशिष जयस्वाल,मुख्य सचिव राजेशकुमार, कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी , प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंह आणि प्रकल्प कार्यालयातील तसेच मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते. वेगाने होत असलेल्या हवामान बदलामुळे राज्यातील शेतीवर प्रतिकूल परिणाम होत असून त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. राज्यातील सुमारे ८२ % जमीन कोरडवाहू असल्यामुळे पिकांच्या वाढीच्या अवस्थेत पडणारा पावसातील खंड पिकांच्या उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम करतो. त्याबरोबरच अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान होते. या सगळ्याचा फटका सर्वच शेतकऱ्यांना आणि विशेषतः अल्प व अत्यल्प भूधारकांना सहन करावा लागतो. वाढते तापमान, अनियमित पाऊस, तीव्र टंचाई, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि दिवसेंदिवस कमी होत असलेली जमीनधारणा यामुळे शेतीमधील जोखीम वाढली आहे. अशा प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीशी सामना करण्यासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढविण्याबरोबरच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे अत्यावश्यक झाले आहे. त्याबरोबरच युवक व महिलांचा शेतीव्यवसायाच्या निर्णयप्रक्रियेमध्ये सहभाग वाढविणे गरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जागतिक बँकेच्या सहाय्याने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प २.० हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील प्रकल्प गावामध्ये शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे वैयक्तिक शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यामध्ये पाण्याच्या व्यवस्थेसाठी नवीन शेततळे, अस्तरीकरण, तुषार व ठिबक सिंचन, विहिरींचे पुनर्भरण, सेंद्रिय खत निर्मिती, फळबाग लागवड, बांबू व वृक्ष लागवड, रेशीम उद्योग, संरक्षित शेती, संवर्धित शेती, बिजोत्पादन इ. हवामान अनुकूल घटकांसाठी डीबीटीद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या मापदंडानुसार अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ५ हेक्टर पर्यंत जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांना हे सर्व लाभ मिळतील. मात्र बिजोत्पादन घटकाचा लाभ घेण्यासाठी कमाल जमीन मर्यादेची अट राहणार नाही. भूमिहीन कुटुंबांना तसेच विधवा, घटस्फोटीत आणि परित्यक्त्या महिलांना उपजीविकेचे साधन निर्माण व्हावे म्हणून शेळीपालन आणि परसातील कुक्कुटपालन या व्यवसायासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या घटकांचा लाभ घेणे सुलभ आणि कागदविरहित व्हावे म्हणून प्रकल्पाने थेट लाभ हस्तांतरण पद्धती (डीबीटी )तयार केली आहे. प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या “महाविस्तार ए आय” या मोबाईल अॅपद्वारे किंवा https://dbt-ndksp.mahapocra.gov.in/ या प्रकल्पाच्या पोर्टलवर जाऊन अर्ज करता येणार आहेत. त्याचबरोबर शेतीमधील खर्च कमी करण्यासाठी, शेतमालावर आधारित कृषी प्रक्रिया व्यवसाय, गावामध्ये साठवणूक सुविधा, कृषि औजारे बँका उभारण्यासाठी शेतकरी गट स्तरावर मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असते. म्हणून नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामार्फत शेतकरी गटांना व कंपन्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी देखील थेट लाभ हस्तांतरण पद्धती तयार केली आहे. शेतकरी गट आणि कंपन्यांना प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी पोर्टलवर अर्ज करता येणार आहे. बदलत्या हवामानाचा शेतीवर होत असलेल्या प्रतिकूल परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना आवश्यक ते सहाय्य करण्यास शासन कटिबद्ध आहे तरी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपली शेती हवामान अनुकूल करावी असे आवाहन करण्यात येत आहे. हवामानानुसार पिकांची फेरपालट यांचा समन्वय साधणारा हा प्रकल्प: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, "राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा थेट लाभ मिळणार आहे. जलसंधारण, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सूक्ष्म सिंचन आणि हवामानानुसार पिकांची फेरपालट यांचा समन्वय साधणारा हा प्रकल्प म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करण्याचं एक ठोस पाऊल आहे. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, आणि हा उपक्रम त्या विश्वासाचा विस्तार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हानिहाय नोडल अधिकारी नेमण्याचा निर्णय या प्रसंगी घेण्यात आला. ” "या प्रकल्पामुळे राज्याच्या कृषी विकासाला नवी दिशा मिळणार आहे. हा उपक्रम फक्त शेतकऱ्यांचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा प्राणवायू ठरेल. या प्रकल्पाद्वारे हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देणाऱ्या तंत्रज्ञानांचा वापर, जैवविविधतेचे संवर्धन, आणि शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. कृषी विभागाने या प्रकल्पासाठी एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारला असून, जलव्यवस्थापन, मृदसंधारण, सौरऊर्जेचा वापर आणि पिकांच्या विविधीकरणास विशेष प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र एआय धोरण २०२५–२०२९” अंतर्गत कॉल फॉर प्रपोझल पोर्टलचं उद्घाटन त्याचसोबत कृषी विभागामार्फत “महाराष्ट्र एआय धोरण २०२५–२०२९” अंतर्गत कॉल फॉर प्रपोझल या उपक्रमाचा यशस्वी शुभारंभ संपन्न झाला. या उपक्रमाद्वारे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), ड्रोन तंत्रज्ञान, आणि डेटा-आधारित उत्पादन व्यवस्थापन यांसारख्या अत्याधुनिक साधनांच्या वापराला चालना मिळणार आहे. या पोर्टल द्वारे स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई), शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि संशोधन संस्था आपल्या तंत्रज्ञानाधारित कल्पना सादर करून शाश्वत शेतीसाठी नवे उपाय सादर करू शकतील. या उपक्रमाचे कौतुक करत “कृषी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे यशस्वी संमिश्रण हे महाराष्ट्राच्या शेतीसाठी परिवर्तनकारी ठरेल” असा विश्वास कृषी मंत्री भरणे यांनी व्यक्त केला. ***

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

• १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन • तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश मुंबई दि. २८ : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह - ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाची घोषणा केली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विभागाच्या सचिव जयश्री भोज, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी आदी उपस्थित होते. यावेळी ‘मुंबई क्लायमेट वीक’ च्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. विकसनशील देशांतील वातावरणीय बदल, अन्न व ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून विकास आणि पर्यावरणीय कृती यांच्यात संतुलन साधण्यासाठी तो प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई क्लायमेट वीकचा मुख्य कार्यक्रम १७ ते १९ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे पार पडेल. त्याचबरोबर या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी शहरभर विविध प्रदर्शने, कार्यशाळा, चित्रपट, कला, क्रीडा, आरोग्य आणि अध्यात्म यांच्याशी निगडीत उपक्रम, आणि क्लायमेट फूड फेस्टिव्हल सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या परिषदेत ग्लोबल साऊथमधील ३० पेक्षा अधिक देशांमधील प्रतिनिधी सहभागी होणार असून यामध्ये व्यवहार्य असा हवामान बदल कृती कार्यक्रम तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे हा कार्यक्रम राज्यांचे मुख्यमंत्री, विविध शहरांचे प्रतिनिधी, उद्योग, सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि युवक यांच्या सहभागातून तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते मुंबई क्लायमेट विकच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच या उपक्रमाची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई हवामान सप्ताह कृतीसह नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृढनिश्चयाचे प्रदर्शन करतो. माननीय पंतप्रधानांनी ठरवलेल्या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक दक्षिणेसाठी न्याय्य, नाविन्यपूर्ण, चांगल्या निधीसह हवामान भविष्य घडवण्यास मदत करण्यास तयार आहेत. ग्लोबल साउथमधील वातावरणीय कृती आणि सहकार्य या क्षेत्रामधील भारताचे नेतृत्व सिद्ध करणारे मुंबई क्लायमेट वीक हे मोठे व्यासपीठ ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईत पहिल्यांदाच "मुंबई क्लायमेट वीक" कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. आता कृती करण्याची वेळ आली आहे. यासाठी आपण समाजातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक व्यवसायाला आणि जीवनाच्या सर्व स्तरांना हवामान बदलाच्या परिणामांविरुद्ध मोहिमेत सहभागी व्हावे लागणार आहे. तसेच त्यांना कृतींद्वारे बदल कसे कमी करायचे हे प्रत्यक्षात सांगावे लागणार आहे. "मुंबई क्लायमेट वीक" कार्यक्रम आयोजित केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी बेंचमार्क देखील निश्चित करावे लागतील, हवामान बदलाच्या क्षेत्रात कृती करण्यासाठी काही ध्येये निश्चित करावी लागतील. त्यासाठी आजपासून कृती सुरू करूया असेही ते म्हणाले. तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्ते मुंबई क्लायमेट वीकच्या व्यासपीठावर एकत्र येऊन वातावरणीय बदलावरच्या सर्वंकष आणि व्यवहार्य उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करतील. हा उपक्रम भारत आणि विकसनशील राष्ट्रांचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचविणारा ठरेल, असेही ते म्हणाले. मुंबई क्लायमेट वीकचा भर अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी सक्षमता या तीन प्रमुख विषयांवर असेल. न्याय, नवोन्मेष आणि वित्तीय दृष्टीकोनातून हे विषय सखोलपणे मांडले जातील. ‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले की, “मुंबई क्लायमेट वीक हा महाराष्ट्र आणि भारतासाठी एक ऐतिहासिक टप्पा असणार आहे. वातावरणीय बदलाला तोंड देण्यासाठी लोकसहभागावर आधारित असे शाश्वत आणि समावेशक उपाय या परिषदेतील मंथनातून तयार होतील.” या उपक्रमाचे नॉलेज पार्टनर मॉनिटर डिलॉईट असणार असून क्लायमेट ग्रुप, इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्ह, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिस्ट्यूट (इंडिया), एव्हरसोर्स, एचटी पारेख फाउंडेशन, युनिसेफ, शक्ती फाउंडेशन, रेनमॅटर फाउंडेशन, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि राष्ट्रीय सेवा योजना यासारख्या संस्था यात सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील यांचे अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे, प्रोजेक्ट मुंबईचे सल्लागार मंडळ सदस्य रिधम देसाई, जलज दाणी आदी यावेळी उपस्थित होते. 0000

27 October, 2025

विसर्ग बंद

🟡 **🟡 *उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्प* *ईसापुर धरण* जयपूर बंधा-यातून येणारा येवा निरंक झाल्यामुळे द्वार प्रचालन आराखड्या (ROS)नुसार धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने *आज दि. 27/10/2025 रोजी 20.00 वाजता ईसापूर धरण सांडव्याचे सूरू असलेले 3 गेट बंद करण्यात आले आहेत.* *सद्यस्थितीत* *इसापूर धरणाच्या सांडव्याची सर्व वक्रद्वारे बंद असून पेनगंगा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग निरंक आहे.* धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून पुन्हा गेट उघडणे,विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल. *ईसापुर धरण पुरनियंत्रण कक्ष*

वैरण बियाणे मागणीसाठी पशुपालकांनी अर्ज करावेत

हिंगोली(जिमाका), दि. 27 : जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदानावर वैरण बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. दूध उत्पादन वाढीसाठी पुरेशा प्रमाणात पौष्टीक चारा उपलब्ध करुन देणे ही प्राथमिक गरज आहे. जनावरास पौष्टीक चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पशुपालकांना चारा उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी चारा उत्पादन कार्यक्रम हा सुधारित कार्यक्रम सन 2025-26 ते सन 2028-29 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या पशुपालकांकडे स्वत:ची शेतजमीन व सिंचनाची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्याकडे भारत पशुधन प्रणालीवर नोंद असलेली किमान 3 ते 4 जनावरे असणे आवश्यक आहे. वैरणीच्या उत्पादनासाठी आवश्यक खते शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खरेदी करणे आवश्यक आहे. सर्व प्रवर्गातील शेतकरी वैरण बियाणे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील. वैरण बियाणे योजनेचे अर्ज ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे मागविण्यात येत आहे. त्यासाठी पशुपालकांनी https://docs.google.com/forms/d/e1FAIpQLSfMfnsAdiw5zsvudxzlKQXArn56AzV71Xm-hgmSpCH5lWJ3g/viewform?usp=header या लिंकवर दि. 15 नोव्हेंबर, 2025 पर्यंत अर्ज करावेत. ही लिंक जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून प्राप्त करुन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी केले आहे. *****

शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा

हिंगोली(जिमाका), दि. 27 : कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या हिंगोली व परभणी जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेमधील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी बाह्यस्त्रोत संस्था मे छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व मे. महाराष्ट्र विकास ग्रुप यांना आदेश देण्यात आलेले आहेत. कळमनुरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत 5 आश्रमशाळा येत असून त्यापैकी 01 आश्रमशाळा ही उच्च माध्यमिक आहे. या शाळेमध्ये उच्च माध्यमिक शिक्षक हे रिक्त पद बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहे. यासाठी एमएससी (रसायनशास्त्र) बीएड टीएआयटी स्कोअर असणे आवश्यक आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी अपर आयुक्त नाशिक व ठाणे विभागाच्या https://scsmltd.com व अपर आयुक्त अमरावती व नागपूर विभागाच्या https://mvgcompany.in या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर दि. 31 ऑक्टोबर, 2025 पर्यंत अर्ज भरण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन कळमनुरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे. *******

"महादेवा" योजनेंतर्गत फुटबॉल खेळण्यासाठी सुवर्णसंधी • 13 वर्षाखालील मुला-मुलींची शुक्रवारी निवड चाचणी

हिंगोली (जिमाका), दि. 27 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली ‘महादेवा’ ही योजना राज्यातील 13 वर्षाखालील मुले व मुलींच्या फुटबॉल खेळातील कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. यासाठी खेळाडूंची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडणार आहे. जिल्हास्तरावरील निवड चाचणी, प्रादेशिक आणि अंतिम निवड फेरी, अंतिम टप्प्यात 60 मुलांची निवड सिडको, खारघर येथे आणि 60 मुलींची निवड डब्ल्यूआयएएफ कूपरेज मैदान, मुंबई येथे केली जाईल. यापैकी 30 मुले व मुलींची निवड केली जाईल आणि त्यांना पाच वर्षांची एकात्मिक शिष्यवृत्ती दिली जाईल. फुटबॉल प्रशिक्षणासोबत शैक्षणिक विकासाचाही समावेश असेल. निवड झालेल्या खेळाडूंना 14 डिसेंबर रोजी मुंबईत येणाऱ्या फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. ही योजना मित्रा, डब्ल्यूआयएफए, सिडको, व्हीएसटीएफ व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात आहे. राज्यातील फुटबॉल क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील जिल्हास्तरीय महादेवा योजनेअंतर्गत 13 वर्षाखालील मुले व मुलींच्या फुटबॉल खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता महात्मा गांधी विद्यालय, वसमत येथे करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांनी दिनांक 01 जानेवारी 2012 ते दि. 31 डिसेंबर, 2013 या कालावधीतील जन्म असलेल्या खेळाडूंना चाचणीकरीता पाठविण्याबाबत सूचना द्याव्यात. सर्व खेळाडूंनी चाचणीस्थळी येण्यापूर्वी https://forms.gle/6PAR766JoC9d2QH26 या गुगल लिंकव्दारे नोंदणी पूर्ण केल्याची खात्री करावी. खेळाडूंना त्याचे मूळ आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व क्लब व शाळांच्या मुले व मुलींनी महादेवा प्रोजेक्ट अंतर्गत जिल्हास्तर फुटबॉल निवड चाचणीत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी क्रीडाधिकारी आत्माराम बोधीकर (9561760878) यांच्याशी व फुटबॉल संघटनेचे सचिव अजगर पटेल (9175767778) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे. ***

26 October, 2025

*इसापूर धरणाचे तीन दरवाजे उघडणार*

• आज रात्री ९ वाजता पैनगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू हिंगोली, दि.२६ (जिमाका): इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे व जयपूर बंधा-यातून येणाऱ्या येव्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे आहे. त्यामुळे इसापूर धरण पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणात येणारे अतिरिक्त पाणी आज रविवारी रात्री ९ वाजता सांडव्याचे तीन दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येणार आहे. तरी पैनगंगा नदीच्या दोन्ही तिरावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, इसापूर धरणाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे. ******

18 October, 2025

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे १७८ कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता

• थेट खात्यावर 141 कोटी 15 लाख रुपयाचे अनुदान डीबीटीद्वारे जमा हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले असून आतापर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डिबीटीव्दारे १७८ कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर 1 लाख 82 हजार 498 शेतकऱ्यांच्या खात्यावर 141 कोटी 15 लाख 3 हजार 339 रुपये मदतीचे अनुदान जमा करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. जिल्ह्यात जून ते ऑगस्ट, 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाने हिंगोली जिल्ह्यासाठी 231 कोटी 27 लाख 92 हजार 335 रुपयांची मदत मंजूर केली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट निधी वितरीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसीलदारांनी 2 लाख 33 हजार 4 शेतकऱ्यांना १७८ कोटी १० लाख ६४८४७ रुपयांच्या निधी वितरित करण्यासाठीची माहिती संगणक प्रणालीवर भरुन डीबीटीद्वारे निधी वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 82 हजार 498 शेतकऱ्यांच्या खात्यावर 141 कोटी 15 लाख 3 हजार 339 रुपयाची मदत डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आली आहे. ई-केवायसी प्रलंबित असलेल्या 48 हजार 539 शेतकऱ्यांना 34 कोटी 89 लाख 3 हजार 861 रुपयाची मदत ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक नोंदणी केल्यानंतर लगेच वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील 33 हजार 49 शेतकऱ्यांना 26 कोटी 95 लाख 21 हजार 322, वसमत तालुक्यातील 43 हजार 915 शेतकऱ्यांना 28 कोटी 28 लाख 34 हजार 78 रुपये, हिंगोली तालुक्यातील 32 हजार 638 शेतकऱ्यांना 25 कोटी 96 लाख 19 हजार 142 रुपये, कळमनुरी तालुक्यातील 35 हजार 258 शेतकऱ्यांना 30 कोटी 77 लाख 56 हजार 916 आणि सेनगाव तालुक्यातील 37 हजार 638 शेतकऱ्यांना 29 कोटी 17 लाख 71 हजार 881 रुपयाची मदत त्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रलंबित राहिलेले 34 कोटी 89 लाख रुपयाचे अनुदान दिवाळीपूर्वी जमा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे. त्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होत आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी नसणाऱ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागत आहे. त्यामुळे सर्व संबंधित शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घेऊन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. *******

17 October, 2025

‘नन्हे सितारे’: आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचा भव्य सोहळा

हिंगोली (जिमाका), दि. 17 : दैनंदिन जीवनात स्पर्धा परीक्षा द्यायची असो किंवा कोणतेही आव्हान पेलायचे असो, त्यात यश मिळवण्यासाठी मुलांची मराठी व इंग्रजी भाषांवर चांगली पकड आणि लॉजिकल रिजनींग आली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी 'नन्हे सितारे' या जीवनकौशल्य आधारित उपक्रमाच्या जिल्हास्तरीय अंतिम फेरीच्या समारोपाप्रसंगी केले. जिल्हा परिषद हिंगोली व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचा नुकताच समारोप झाला. यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, डायटचे प्राचार्य भानुदास पुटवाड आणि ओएलएफचे विभाग व्यवस्थापक चित्रा खन्ना हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, जिल्हा प्रशासनाने देखील 30 तासांचा विशेष अभ्यासक्रम डायटच्या मदतीने जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पोहोचवला आहे. यामध्ये गणित, विज्ञान आणि भाषांचा समावेश आहे. “जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, जेएनव्ही आणि सैनिक शाळांमध्ये यशस्वी व्हावे अशी आमची इच्छा आहे. हा अभ्यासक्रम वापरण्यास सोपा आहे. जेणेकरून पालकांनाही तो वाचून समजू शकेल आणि ते त्यांच्या मुलांना अभ्यासात मदत करू शकतील. यासोबतच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी मुलांना दररोज मैदानावर खेळायला पाठवावे, असे आवाहन केले. 'नन्हे सितारे' उपक्रमाचे उद्दिष्ट केवळ स्पर्धा घेणे नसून, विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास, आत्मविश्वास वृद्धी आणि सर्जनशील अभिव्यक्तीला योग्य वाव देणे हा आहे. सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या या उपक्रमाला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, शालेय व तालुका स्तरावरील प्राथमिक फेऱ्यांमधून निवडलेले एकूण 22 स्पर्धक जिल्हास्तरीय ग्रँड फायनलमध्ये आपली प्रतिभा सादर करण्यासाठी एकत्र आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील अनुभवी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पोकन इंग्लिश आणि स्पेलिंग बी या स्पर्धांसाठी जिल्हा परिषद शिक्षक पंकज हलगे, हरीश पाटोदकर आणि चंकीकुमार शहाणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ‘कथाकथन’आणि ‘कवितावाचन’स्पर्धांसाठी जिल्हा परिषद शिक्षक दीपक कोकरे (कोठलाज दिग्रस क), बबन दांडेकर (सिरसम) आणि राजकुमार मोर्गे (सिद्धेश्वर) यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. या स्पर्धेमध्ये चार गटांमध्ये (इयत्ता 1 ते 3, इयत्ता 4 ते 5, इयत्ता 6 ते 8, आणि इयत्ता 9 ते 12 वी) स्पोकन इंग्लिश, स्पेलिंग बी, कथा वाचन आणि कविता वाचन या चार प्रमुख स्पर्धा प्रकारांत विजेत्यांचा गौरव करण्यात आला. स्पोकन इंग्लीश इयत्ता 1 ली ते 3 रीच्या गटामध्ये आजेगाव येथील शौर्य चाटसे पहिला, सवड येथील श्रद्धा घुमडे दुसरा आणि दिग्रस क. येथील आरुषी राखुंडे यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे. स्पोकन इंग्लीश इयत्ता 4 थी ते 5 वी गटामध्ये महागाव येथील रितेश जाधव पहिला व सांडस येथील सौरभ बलखंडे दुसरा क्रमांक मिळवला आहे. इयत्ता 6 वी ते 8 वी गटामध्ये सांडस येथील समरीन शेख ही विजेती ठरली आहे. स्पेलींग बी इयत्ता 4 थी ते 5 वीच्या गटामध्ये वसमत तालुक्यातील बोरला येथील आर्या कदम, इयत्ता 6 वी ते 8 वीच्या गटामध्ये कळमनुरी तालुक्यातील मोरवड येथील चंद्रकांत मेंढे विजेता ठरला आहे. कथा वाचन इयत्ता 1 ली ते 3 रीच्या गटामध्ये दिग्रस क. येथील समृद्धी कऱ्हाळे, आंखालीवाडी येथील आराध्या दराडे या विजेत्या ठरल्या आहेत. इयत्ता 4 थी ते 5 वीच्या गटामध्ये सांडस येथील अनिता जाधव, दिग्रस क. येथील चक्रधर कऱ्हाळे विजेते ठरले आहेत. इयत्ता 6 वी ते 8 वीच्या गटामध्ये इडोळी येथील वेदिका जाधव ही विजेती ठरली आहे. कविता वाचन इयत्ता 1 ली ते 3 रीच्या गटामध्ये वाळू ना. येथील ज्ञानवी वाकोडे, दिग्रस क. येथील अनुष्का कऱ्हाळे व कोळसा येथील श्रेया तोंडे या विजेत्या ठरल्या आहेत. इयत्ता 4 थी ते 5 वीच्या गटामध्ये दिग्रस येथील राधिका शेळके, टाकळखोपा येथील वेदिका कायरे विजेत्या ठरल्या आहेत. इयत्ता 6 वी ते 8 वीच्या गटामध्ये इडोळी येथील तेजल जाधव, साळवा येथील नम्रता कदम विजेती ठरली आहे. ओपन लिंक्स फाऊंडेशन कम्युनिटीचे विकास व्यवस्थापक विजय वावगे आणि त्यांच्या टीमने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर प्रकल्प व्यवस्थापक रघुनाथ वानखडे, प्रकल्प अधिकारी आशा बस्सी आणि संपूर्ण ओएलएफ टीमच्या सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. 'नन्हे सितारे' ही स्पर्धा हिंगोली जिल्ह्यात नुकत्याच सुरू झालेल्या “आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम”या अंतर्गत आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षकांचे सक्षमीकरण करणे आणि नवोपक्रमशील अध्यापनाला चालना देणे हा आहे. ‘विनोबा ॲप’या तंत्रज्ञान मंचाद्वारे शिक्षक आणि प्रशासकांना सहज आणि सोप्या पद्धतीने जोडणी साधणे शक्य झाले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासाठी प्रक्रिया सुलभ झाली असून, शिक्षकांना यापूर्वी कधी नव्हे इतकी प्रेरणा मिळाली आहे. 'नन्हे सितारे'सारखा हा अनोखा उपक्रम याच सामूहिक प्रेरणा आणि अध्ययनाच्या प्रक्रियेचा भाग आहे. ओपन लिंक्स फाउंडेशन “विनोबा कार्यक्रम” अंतर्गत महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांतील 35 जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागासोबत कार्यरत आहे. या कार्यक्रमांतर्गत ओएलएफसोबत 53 हजार 132 शाळा आणि 1 लाख 81 हजार 551 शिक्षक जोडले गेले आहेत. सरकारी शाळांना प्रेरणादायी बनवणे, शिक्षकांना प्रोत्साहन देणे आणि तंत्रज्ञान व व्यवहार विज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण व्यवस्थेची अंमलबजावणी क्षमता वाढवणे, हे ओएलएफचे मुख्य उद्दिष्ट आहे. ******

मोटार सायकल संवर्गासाठी नवीन वाहन क्रमांक मालिका चालू

हिंगोली (जिमाका), दि. 17 : यापूर्वीची मोटार सायकल संवर्गासाठीची मालिका एमएच-38-एजे ही संपुष्टात आल्यामुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवीन मालिका एमएच-38-एएम0001 ते 9999 ही मालिका चालू करण्यात येत आहे. ज्या वाहन मालकांना वाहनासाठी आकर्षक क्रमांक राखीव करावयाचा आहे. त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून किंवा ऑनलाईन पध्दतीने आपला आकर्षक क्रमांक विहित शासकीय शुल्क भरुन राखीव करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी केले आहे. ******

समाज कल्याण विभागाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 17 : सामाजिक न्याय विभागाची स्थापना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून 15 ऑक्टोबर, 1932 रोजी झाली आहे. या विभागाच्या स्थापनेला दि. 15 ऑक्टोबर, 2025 रोजी 93 वर्षे पूर्ण झाल्यामुळे येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी लागणाऱ्या कागदपत्राबाबत माहिती देण्यात आली. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच त्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना व प्रवेशाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष शरद कुलकर्णी, सदसय् प्रसाद कुलकर्णी व सदस्य सचिव सुनिल खामितकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ******

दिवाळी सणानिमित्त अन्नपदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 17 : दिवाळी सणासाठी जनतेकडून मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थाची खरेदी करण्यात येते. अशा वेळी अन्न पदार्थामध्ये भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढते. अशा प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी व जनतेस निर्भेळ अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अनंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विशेष मोहिम राबवित आहेत. या मोहिमेंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यांमधून व सर्व स्तरांवरून किरकोळ विक्रेता, वितरक, उत्पादक, मिठाई विक्रेता, दुध विक्रेते, किराणा अन्न पदार्थ इत्यादीकडून अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. या मोहिमेमध्ये 56 अन्न नमुने ज्यामध्ये तेल, मिठाई, दूध, दुग्धजन्य पदार्थ इत्यादी अन्नपदार्थाचा समावेश आहे. सन 2025-26 या वर्षात आजपर्यंत 7 प्रकरणामध्ये 4 लाख 29 हजार 40 रुपये किमतीचे अन्नपदार्थ भेसळीच्या अनुषंगाने जप्त करण्यात आले आहे. हे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. काही अन्न नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये दुध व तत्सम पदार्थांचे 7 अहवाल प्रमाणित आले व 2 अहवाल कमी दर्जाचे प्राप्त झाले. कमी दर्जाच्या अहवालांवर कायद्यांतर्गत कार्यवाही सुरु आहे. उरलेल्या अन्न पदार्थांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि अन्न पदार्थामध्ये भेसळ आढळून आल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियम व नियमनांच्या अनुषंगाने संबंधित अन्न पदार्थ विक्रेत्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. दिवाळीनिमित्त अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी. मिठाईची खरेदी करताना शक्यतो ती ताजी असल्याची खात्री करुन आवश्यकतेनुसार खरेदी करावी. खरेदी केलेल्या अन्न पदार्थाचे पक्के बील घ्यावे. परवानाधारक, नोंदणीधारक पेढीकडूनच अन्न पदार्थाची खरेदी करावी. अनोळखी व्यक्तीकडून अन्न पदार्थाची खरेदी करु नये. भडक खाद्यरंग असलेली मिठाई खरेदी करु नये. खवा, मावा यापासून तयार केलेली मिठाई शक्यतो चार तासात खावी. मिठाईवर बुरशी आढळून आल्यास ती खाऊ नये. मिठाई खराब झाल्याची शंका आल्यास ती नष्ट करावी. उघड्यावरचे अन्न पदार्थ खरेदी करण्याचे टाळावे. पॅकबंद अन्न पदार्थ खरेदी करताना बॅच नंबर, बेस्ट बिफोर दिनांक, एक्सपायरी दिनांक तपासून खरेदी करावे. खाद्यतेलाचे टिन खरेदी करताना ते गंजलेले असल्यास खरेदी करु नये. खाद्यतेलाचे पक्के खरेदी बील घ्यावे. यानंतरही अन्न पदार्थ, मिठाई खरेदी करताना शंका आल्यास अन्न व औषध प्रशासन, हिंगोली कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. ******

प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख नियुक्तीसाठी ऑनलाईन परीक्षा

हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दि. 1 ते 5 डिसेंबर, 2025 या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. दि. 29 सप्टेंबर, 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या अधिसूचनेतील जाहिरातीस अनुसरून निश्चित अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीए, बीकॉम, बीएससी ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शासन निर्णय दि. 29 ऑगस्ट, 2025 नुसार दि. 1 जानेवारी 2025 रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. *****

हिंदू खाटीक समाजातील इच्छूक अर्जदाराने विविध योजनेसाठी अर्ज करा

हिंगोली (जिमाका), दि. 17 : हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. यांची उपकंपनी) जिल्हा कार्यालय हिंगोली येथे सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योनजेंतर्गत 04 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट असून बीज भांडवल योजनेंतर्गत 4 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट आहे. थेट कर्ज योजनेंतर्गत 2, एनएसएफडीसी योजनेंतर्गत 5 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट आहे. यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, कोटेशन, प्रकल्प अहवाल, व्यवसायाचा जागेचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, व्यवसायाचे लायसन्स इत्यादी कागदपत्रांच्या 2 छायांकित प्रती अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. हिंदू खाटीक समाजातील इच्छूक अर्जदाराने वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी नोव्हेंबर, 2025 अखेरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. ******

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली*

मुख्यमंत्री सचिवालय ( जनसंपर्क कक्ष) शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर, २०२५ *जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले* मुंबई, दि. १७ : ज्येष्ठ नेते, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे आकस्मिक निधन हे राहुरीसह, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'आमदार कर्डीले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी साठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय अशा आमदार कर्डीले यांनी राहुरी मतदार संघ आणि अहिल्या नगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. याच जोरावर त्यांनी सलगपणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राहुरी मतदार संघातील एक संवेदनशील नेतृत्व हरपले आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार कर्डीले यांच्या निधनाने कर्डीले आणि जगताप कुटुंबियांवर आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. 0000

16 October, 2025

दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय प्रतिबंधक समितीमार्फत धडक मोहीम

हिंगोली (जिमाका), दि. 16 : दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या संभाव्य भेसळीच्या अनुषंगाने धडक मोहीम राबवून समितीमार्फत जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थाची जास्तीत जास्त प्रमाणात तपासणी करण्यात यावी व भेसळ आढळून आल्यास कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाई करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी बैठकीत दिल्या. जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थातील होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय गठीत समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्या दालनात नुकतीच बैठक पार पडली असून या बैठकीस सदस्य सचिव तथा जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी शिवाजी गिनगिने, अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. खताळ, डॉ. आर. ए. कल्ल्यापुरे, वैधमापन विभागाचे सहायक निरीक्षक एम. बी. धाबे उपस्थित होते. दीपावली सणानिमित्त मिठाई, खवा, पनीर, मैदा, हळद पावडर, खाद्यतेल अशा प्रकारच्या अन्नपदार्थाची खरेदी करताना काळजी घ्यावी. मिठाई शक्यतो ताजी असल्याची खात्री करुन आवश्यकतेनुसार घ्यावी. मिठाई सेवन शक्यतो 24 तासाच्या आत करावे. मिठाई परवानाधारक, नोंदणीधारकाकडूनच खरेदी करावी. खरेदी केलेल्या अन्नपदार्थाचे पक्के बील घ्यावे. पॅकबंद अन्नपदार्थ खरेदी करताना बॅच नंबर, बेस्ट बिफोर दिनांक, एक्सपायरी दिनांक तपासून खरेदी करावे. यानंतरही अन्नपदार्थ मिठाई खरेदी करताना शंका आल्यास तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे आढळून आल्यास तसे जिल्हा समितीच्या निदर्शनास आणून द्यावेत. यासाठी टोल फ्री क्रमांक 9923689168 / 9049518711 यावर आपली तक्रार नोंदविण्यात यावी अथवा जिल्हा ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन समितीमार्फत जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *****

खाजगी बस धारकांकडून अधिकचे भाडे आकारल्यास तक्रार करावी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे

हिंगोली, (जिमाका) दि.16: आगामी सणासुदीच्या काळात प्रवासी हे मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे खाजगी प्रवासी बसधारकांकडून मनमानी भाडेवाढ करण्यात येते. वास्तविक खाजगी प्रवासी बसेसने एसटी महामंडळाने विशिष्ट बस संवर्गासाठी विहित केलेल्या भाड्याच्या दीडपट पेक्षा अधिक आकारु नये, असे निर्देश परिवहन आयुक्तांनी वेळोवेळी दिलेले आहेत. तसेच याबाबत कमाल भाडे दर शासनाने दि. 27 एप्रिल, 2018 च्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहेत. त्यानुसार कंत्राटी बसेसचे प्रती आसन कमाल भाडेदर पुढीलप्रमाणे आहे. हिंगोली येथून मुंबईसाठी साधी बस (3x2) 1522 रुपये, निमआराम नॉन एसी 2067 रुपये, शिवशाही एसी सीटर 2424 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 3840 रुपये आणि स्लीपर एसी 2530 याप्रमाणे आहे. हिंगोलीपासून पुणे येथे जाण्यासाठी साधी बस (3x2) 1160 रुपये, निमआराम नॉन एसी 1576 रुपये, शिवशाही एसी सीटर 1848 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 2928 रुपये आणि स्लीपर एसी 1929 याप्रमाणे आहे. कोल्हापूर साठी साधी बस (3x2) 1417 रुपये, निमआराम नॉन एसी 1924 रुपये, शिवशाही एसी सीटर 2256 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 3574 रुपये आणि स्लीपर एसी 2355 याप्रमाणे आहे. नागपूरसाठी साधी बस (3x2) 829 रुपये, निमआराम नॉन एसी 1126 रुपये, शिवशाही एसी सीटर 1320 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 2091 रुपये आणि स्लीपर एसी 1378 याप्रमाणे आहे. इंदौर (वाशिम मार्गे) साधी बस (3x2) 1145 रुपये, निमआराम नॉन एसी 1556 रुपये, शिवशाही एसी सीटर 1824 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 2890 रुपये आणि स्लीपर एसी 1904 याप्रमाणे आहे. सुरत (छत्रपती संभाजीनगर मार्गे) साधी बस (3x2) 1552 रुपये, निमआराम नॉन एसी 2108 रुपये, शिवशाही एसी सीटर 2472 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 3916 रुपये आणि स्लीपर एसी 2580 याप्रमाणे आहे. छत्रपती संभाजीनगर साठी साधी बस (3x2) 558 रुपये, निमआराम नॉन एसी 757 रुपये, शिवशाही एसी सीटर 888 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 1407 रुपये आणि स्लीपर एसी 927 याप्रमाणे आहे. हैद्राबाद साठी साधी बस (3x2) 964 रुपये, निमआराम नॉन एसी 1310 रुपये, शिवशाही एसी सीटर 1536 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 2433 रुपये आणि स्लीपर एसी 1603 याप्रमाणे आहे. सोलापूरसाठी साधी बस (3x2) 1055 रुपये, निमआराम नॉन एसी 1433 रुपये, शिवशाही एसी सीटर 1680 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 2661 रुपये आणि स्लीपर एसी 1754 याप्रमाणे आहे. अमरावती साठी साधी बस (3x2) 437 रुपये, निमआराम नॉन एसी 594 रुपये, शिवशाही एसी सीटर 696 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 1103 रुपये आणि स्लीपर एसी 726 याप्रमाणे आहे. अकोला साठी साधी बस (3x2) 316 रुपये, निमआराम नॉन एसी 430 रुपये, शिवशाही एसी सीटर 504 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 798 रुपये आणि स्लीपर एसी 526 याप्रमाणे आहे. वाशिम साठी साधी बस (3x2) 121 रुपये, निमआराम नॉन एसी 164 रुपये, शिवशाही एसी सीटर 192 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 304 रुपये आणि स्लीपर एसी 200 याप्रमाणे आहे. परभणी साठी साधी बस (3x2) 196 रुपये, निमआराम नॉन एसी 266 रुपये, शिवशाही एसी सीटर 312 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 494 रुपये आणि स्लीपर एसी 326 याप्रमाणे आहे. नांदेडसाठी साधी बस (3x2) 226 रुपये, निमआराम नॉन एसी 307 रुपये, शिवशाही एसी सीटर 360 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 570 रुपये आणि स्लीपर एसी 376 याप्रमाणे आहे. अधिकचे भाडे आकारल्यास प्रवाशांनी हिंगोली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या dyrto.38-mh@gov.in या ई-मेलवर किंवा 9657851836, 8087705550 या व्हॉटस्अप क्रमांकावर तक्रार दाखल करावी. तसेच भाडे दर विविध ठिकाणी खाजगी प्रवासी बसेस बुकींगच्या दर्शनी भागात, बसेसमध्ये, कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेले आहेत. शासन निर्णयानुसार खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे दर राज्य परिवहन महामंडळाच्या समकक्ष संवर्गाच्या वाहनाच्या एकूण भाडे दराच्या दीड पट पेक्षा अधिक राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. ******

लॅपटॉप खरेदीकरिता अर्थसहाय्य पुरविण्यासाठी 80 लाभार्थींची निवड

• निवड झालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रस्ताव सादर करावेत हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्हा परिषद सेस योजना सन 2025-26 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीकरिता अर्थसहाय्य पुरवणे या योजनेसाठी लाभार्थीचे पंचायत समिती स्तरावरून अर्ज मागविण्यात आले होते. पात्र लाभार्थ्यांमधून ईश्वर चिठ्ठीव्दारे 80 लाभार्थीची निवड करून निवड यादी जिल्हा परिषद, पंचायत समिती व हिंगोली जिल्ह्याच्या www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव अनुदान मागणी अर्ज, लॅपटॉप खरेदी केल्याची जी.एस.टी.चे बील, लॅपटॉपसह लाभार्थीचा 4x6 आकाराचा कलर फोटो, अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या सध्याच्या महाविद्यालयाचे मूळ प्रतीत बोनाफाईड प्रमाणपत्र, लाभार्थ्यांची बँक खात्याच्या पासबुकांची झेरॉक्स प्रत. (खात्यावरील नाव, खाते क्रमांक व आयएफएससी कोड स्पष्ट दिसेल अशा प्रकारचा असावा) व लाभार्थी अथवा त्यांचे आई वडील व पालक यापैकी कोणीही शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचे सरपंच/ग्रामपंचायत अधिकारी यांचे प्रमाणपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सादर करावा. या योजनेमधून कुटूंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्यात येईल. जर ईश्वर चिठ्ठीद्वारे एका कुटुंबातील दोन व्यक्तींची निवड झाली असेल तर प्रथम निवड झालेल्या लामार्थीना लाभ देण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष लाभ देण्यापूर्वी लाभार्थी हा शैक्षणिक अथवा इतर कारणास्तव अपात्र ठरल्यास त्याऐवजी प्रतीक्षा यादीतील लाभार्थीना प्राधान्यक्रमांने लाभ देण्यात येईल याची नोंद घ्यावी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******

संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हिंगोली येथे “जागर संविधानाचा” सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

हिंगोली, दि. १६, (जिमाका) : संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने “जागर संविधानाचा” या दोन दिवसीय जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या कल्पनेतून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १८ व १९ ऑक्टोबरदरम्यान शिवाजीराव देशमुख सभागृह, हिंगोली येथे होणार आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय संविधान निर्मितीस २ वर्षे, ११ महिने आणि १७ दिवस इतका कालावधी लागला होता. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद तर प्रारुप समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मानवी मूल्यांचे रक्षण करणारे हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आले. या ऐतिहासिक घटनेस ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी संविधानावर आधारित शाहिरी, पोवाडा, गीत, कवने अशा विविध कलाप्रकारांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मुंबई येथील गायक अशोक निकाळजे व संच तसेच हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक गायक दिनकर लोणकर व संच संविधान विषयावर आधारित सादरीकरण करतील. रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी संविधानावर आधारित एक प्रेरणादायी महानाट्य सादर होणार आहे. या महानाट्याचे लेखन व दिग्दर्शन वैभव महाडिक यांनी केले असून शाहिरी, गीत आणि संवाद अशा बहुआयामी कलारूपात हे नाट्य सादर होईल. हिंगोली येथे होऊ घातलेल्या संविधान अमृत महोत्सवी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी कलाकारांच्या सादरीकरणातून भारतीय संविधानातील लोकशाही मूल्यांचा जागर होणार असून, कला रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमांचा नक्कीच लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे. *******

15 October, 2025

शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 15: वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न् व माहिती समृध्द समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास होणे आवश्यक आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थरितीने जतन करुन त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांना वाचनाची आवड व प्रेरणा निर्माण करणे व वाचनाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी दरवर्षी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा (15ऑक्टोबर) हा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन"साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त विविध साहित्यकृतींचे, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हिंगोली येथे करण्यात आले होते. याचे उद्घाटन जिल्हा सांख्यिकी अधिकारी एस. एम. रचावाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, सहायक जिल्हा सांख्यिकी अधिकारी अतीवीर करेवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, श्रीमती मोहिनी दिक्षीत, चंद्रकांत नानगरे, मिलिंद सोनकांबळे, शंभूनाथ दुभळकर, ग्रंथालय पदाधिकारी व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी 50 ते 60 विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त शासकीय वाचनालयास भेट दिली व ग्रंथालयाची माहिती करुन घेतली. तसेच आयोजित ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतला. ग्रंथप्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका हिंगोली येथे सर्वांकरिता खुले असून सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व शासकीय ग्रंथालयाचे सभासद व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे. ****

लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

*₹25 लाखाच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत* मुंबई, दि. 15 : अकोला येथील 16 वर्षीय मुलाला रक्ताचा कर्करोग झाल्याने त्याच्यावर बोन मॅरो प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. परंतु उपचाराचा खर्च कुटुंबाला उपचार परवडणारे नव्हते. या संकटाच्या काळात 12 वर्षीय लहान भावाने आपल्या मोठ्या भावाला ‘स्टेम सेल्स दान करून त्याचे प्राण वाचवले. तर आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने पुढाकार घेतल्याने उपचार शक्य झाले. जीवन (नाव बदलले आहे) हा 16 वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसह आणि 12 वर्षीय लहान भावासोबत अकोला येथे राहतो. वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही महिन्यांपासून जीवन सतत आजारी पडत होता. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला पुढील तपासणीसाठी मोठ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे रक्त तपासणीतून जीवनला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचाराकरिता बोन मॅरो प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. तसेच उपचारासाठी सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्चाचा अंदाज वर्तविला. या परिस्थितीत डॉक्टरांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत घेण्याचा सल्ला दिला होता. जीवनच्या पालकांनी तातडीने मुंबई गाठली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षात धाव घेत, कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याशी संपर्क साधला. श्री.नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार तातडीने कार्यवाही केली. त्यातूनच मुंबई येथील जसलोक रुग्णालयात जीवनवर उपचार सुरू करण्यात आले. *विविध स्रोतांतून मदतीचा हात* मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून, टाटा ट्रस्टच्या मोठ्या योगदानातून तसेच काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने एकूण 25 लाखांची मदत उभी करण्यात आली. 4 सप्टेंबर 2025 रोजी जीवनच्या 12 वर्षीय लहान भावाने अस्थिमज्जा (स्टेम सेल्स) दान केले आणि त्यानंतर जसलोक रुग्णालयात जीवनवर यशस्वी बोन मॅरो प्रत्यारोपन करण्यात आले. *जीवनप्रमाणे अनेक रुग्णांना मदतीचा हात* _जीवनप्रमाणेच अनेक गरीब व गरजू रुग्णांवर संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उपचार करण्यात येत आहेत. दुर्धर आजार झाल्यास कोणीही हताश न होता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संपर्क साधावा. त्यासाठी नागरिकांनी 1800 123 2211 या क्रमांकावर संपर्क साधावा._ - रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष. 000

वसमत येथे ग्राम बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण संपन्न

हिंगोली(जिमाका), दि. 15: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत कार्यरत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने ‘मिशन वात्सल्य’ योजनेअंतर्गत वसमत येथील पंचायत समिती सभागृहात नुकतेच ग्राम बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात वसमत येथील गट विकास अधिकारी प्रफुल तोटेवाड आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रिया लखमोड हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून सर्वांनी सजगतेने कार्य करणे गरजेचे आहे. बालकांच्या समस्या जाणून घेऊन सर्वांनी त्याबाबत जागरूक राहून त्यांचे निरसन करणे गरजेचे आहे. आपण बालकांना चांगला व वाईट स्पर्श याविषयी माहिती द्यायला हवी जेणेकरून कोणीही बालकांचा गैरफायदा घेऊ शकणार नाही, याविषयी गट विकास अधिकारी प्रफुल तोटेवाड यांनी माहिती दिली. गावातील बालविवाह होण्याची शक्यता असलेल्या कुटुंबांच्या घरी ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून भेट देऊन त्यांचे समुपदेशन करून बालविवाह थांबविण्यात यावेत आणि बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीकोनातून कार्य करावे अशी माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रिया लखमोड यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी तर सूत्रसंचालन कायदा तथा परीविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित यांनी केले. या प्रशिक्षणात विविध विषयांवर संबंधित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ग्राम बाल संरक्षण समितींची भूमिका, जबाबदाऱ्या व बाल संरक्षण यंत्रणेचे कार्य तसेच ग्राम बाल संरक्षण समितीचे गठन याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी महत्त्व स्पष्ट केले. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत कायदेशीर बाबी आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत तसेच दत्तक विधान कायदेशीर प्रक्रिया याविषयी कायदा तथा परीविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित यांनी माहिती दिली. महिला व बाल विकास विभागाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजन, प्रतिपालकत्व योजना, अनाथ प्रमाणपत्र, बालगृह, निरीक्षणगृह यासह विविध योजनाबाबत सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाइन 1098 नंबर बाबत तात्काळ सेवा व फोन रिस्पॉन्स सिस्टीमची माहिती चाईल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी दिली. आभार प्रदर्शन बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे यांनी केले. या प्रशिक्षणासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ती रेश्मा पठाण, माहिती विश्लेषक शेख रफिक, लेखापाल शीतल भंडारे, क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुद्ध घनसावंत, चाईल्ड हेल्पलाइन 1098 चे सुपरवायझर धम्मप्रिया पखाले, श्रीकांत वाघमारे, केस वर्कर तथागत इंगळे, राजरत्न पाईकराव, सुरज इंगळे, समुपदेशक अंकुर पाटोडे, सखी वन स्टॉप सेंटरचे जहीर खान गफूर शाह यांनी सहकार्य केले. *****

दिव्यांगाप्रती संवेदनशील राहून शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

* अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जनजागृती कार्यशाळेचे आयोजन हिंगोली, दि. 15 (जिमाका) : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अन्वये शासन दिव्यांगासाठी धोरण आणणार आहे. जिल्ह्यात अपंग पुनवर्सन केंद्र कार्यान्वित झाले आहे. जिल्ह्यात प्रत्येक दिव्यांगाचा सर्वे करण्यात येणार आहे. त्यामध्ये 22 ते 23 प्रकारच्या दिव्यांगाचा शोध घेण्यात येणार असून, या सर्वेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचून त्यांच्याप्रती संवेदनशील राहून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना केले. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अन्वये दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळेचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक दत्ता केंद्रे, एसआरपीएफचे समादेशक श्री. दामणवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, जिल्हा ग्राहक मंचाचे सदस्य विष्णू धबडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, *इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यादव गायकवाड*, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी गिता गुठ्ठे आदी उपस्थित होते. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अन्वये शासन दिव्यांगासाठी धोरण तयार करण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांगांना ऑनलाईन तसेच भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. शासनामार्फत दिव्यांग फ्रेंडली पुस्तक तयार करण्यात येणार आहे. यासाठी आपल्या सूचना जिल्हा प्रशासनाला पाठवता येतील. आपल्या सूचना शासनाकडे पाठवून दिव्यांगाना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. दिव्यांग व्यक्ती समाजाचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने कार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली आहे, असे प्रतिपादन असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याप्रसंगी सांगितले. दिव्यांगाप्रती सौहार्दपूर्ण वागणूक ठेवून त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात आणि दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी त्यांना इतरांप्रमाणे समान संधी देऊन शासनाच्या विविध योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा, असे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी यावेळी सांगितले. यावेळी ॲड. विष्णू धबडे यांनी दिव्यांगाचे हक्क, कर्तव्य आणि अधिकार यांची माहिती देऊन दिव्यांग व्यक्तींना मूलभूत शिक्षणाबरोबर संगणक शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच यावेळी ॲड. विनोदकुमार दायमा, ॲड. एन.एम. मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे यांनीही या कार्यशाळेत विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांविषयी, त्यांच्याशी वर्तणुकीतील संवेदनशीलता, तसेच शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देण्याबाबत मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी गिता गुठ्ठे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, हिलन केलर, लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आज ‘जागतिक पांढरी काठी दिन’ असल्याने एका अंध शिक्षकाला पांढरी काठी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक श्री. दाभाडे यांनी दिव्यांगाविषयी कविता सादर केली. श्री. पिंगळकर यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त सुगम्य शासन आणि जबाबदारी याबाबतच्या माहितीचे वाचन केले. या कार्यशाळेस विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आश्रमशाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *****

माओवाद पर्वाच्या समाप्तीची सुरुवात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

* *सर्वोच्च नेता भूपतीसह ६१ माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सशस्र आत्मसमर्पण* *मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांना १ कोटींचे बक्षीस जाहीर* गडचिरोली दि. १५ ऑक्टोबर (जिमाका) : केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून माओवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल वरिष्ठांसह एकूण ६१ सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले. ही माओवादाच्या समाप्तीची सुरुवात असून माओवाद १०० टक्के हद्दपार होणार, अशा परिस्थितीत आज आपण पोहोचलो असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. या लढाईचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा करत आहे, हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा मुद्दा आहे असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे साडेपाच कोटींहून अधिक बक्षीस असलेल्या नक्षल चळवळीतील सर्वोच्च नेता भूपती उर्फ मल्लोजुल्ला वेणूगोपालराव याच्यासह माओवादी केंद्रीय समितीच्या दोन डिकेएसझेडसी सदस्य, १० डिव्हीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एकूण ६१ जहाल माओवादी सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले. त्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह व माओवादी गणवेशात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले. या सर्व आत्मसमर्पित माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात स्वागत करण्यात आले. पोलिस महासंचालक रश्मि शुक्ला, राज्य गुप्त वार्ताचे आयुक्त शिरीष जैन, अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल, केंद्रीय रिझर्व पुलिस बल उप महानिरीक्षक (परिचालन) अजय शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आदी मान्यवर गडचिरोली पोलिस मुख्यालयातील पांडू आलाम सभागृहात प्रामुख्याने उपस्थित होते. *ऐतिहासिक आत्मसमर्पण आणि नवीन इतिहास* मुख्यमंत्री म्हणाले की, ४० वर्षांपूर्वी अहेरी, सिरोंचा या भागात नवीन दलम सुरू करून मावोवाद चळवळ उभी करणाऱ्या भूपतीसारख्या वरिष्ठ माओवादी नेत्याने आज ६१ साथीदारांसह सशस्र आत्मसमर्पण केले आहे. "ही देशाच्या इतिहासातील अत्यंत मोठी घटना आहे," असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, आजच्या आत्मसमर्पणातून नवीन इतिहास लिहिल्या गेला आहे. यापूर्वी उत्तर गडचिरोलीतून माओवाद संपुष्टात आणण्यात आला आहे, आणि आजच्या या आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीतील माओवादही संपुष्टात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांनी जे काही ८ ते १० माओवादी शिल्लक आहेत, त्यांना आत्मसमर्पण करून मुख्य धारेत येण्याचे आवाहन केले, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला. *समता केवळ संविधानातूनच* मुख्यमंत्र्यांनी गेल्या ४० वर्षांपासून दंडकारण्याच्या या भागातील गडचिरोलीची माओवादाशी सुरू असलेली लढाईबाबत सांगितले, यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहिला. 'पिपल्स वॉर ग्रुप' सुरू झाल्यापासून माओवादी सक्रिय झाले आणि त्यांनी येथील युवकांमध्ये व्यवस्थेविरुद्ध संभ्रम निर्माण करून, संविधान-निर्मित व्यवस्था उलथून नवीन व्यवस्था सुरू करण्याचे स्वप्न दाखवले. मात्र समता व न्याय फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित संविधानातूनच येऊ शकते या वास्तविकतेची जाणीव झाल्याने माओवादी चळवळीच्या नादी लागलेले आता आत्मसर्पण करत आहेत. *आत्मसमर्पणाचे धोरण आणि पुनर्वसनाची ग्वाही* आत्मसमर्पण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी संविधानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. "संविधानाचा आदर करेल, त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होईल असा संदेश आम्ही आत्मसमर्पितांच्या पुनर्वसनातून देऊ," असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, "प्रत्येकाचे उचित पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही" अशी ग्वाही त्यांनी दिली. यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्यांना येथील उद्योगांमध्ये प्रशिक्षण देऊन नोकरी देण्यात आली असून, भविष्यातही रोजगार देऊन पुनर्वसन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या आत्मसमर्पणानंतर सर्व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना पुनर्वसनासाठी एकत्रितपणे एकूण ३ कोटी ०१ लाख ५५ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. *केंद्र सरकारची रणनीती* मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून माओवादाविरुद्ध ठरवलेल्या धोरणाचे आणि गृहमंत्री अमित शाह यांनी २०२६ पर्यंत माओवाद संपवण्यासाठी केलेल्या रणनीतीचे कौतुक केले. या धोरणात आत्मसमर्पणातून मुख्य प्रवाहात सामील होणे किंवा पोलिस कारवाईला सामोरे जाणे हे दोनच पर्याय ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे देशातून मोठ्या प्रमाणात माओवादाचे उच्चाटन होत असल्याचे त्यांनी सांगितले. *गडचिरोली पोलिसांचे अभिनंदन आणि पुरस्कार* मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली पोलिसांनी सातत्याने मावोवादविरूद्ध मोहिमा आखून माओवादाला जेरबंद व नेस्तनाबूत केले आणि विकास कामांतून नवीन माओवाद्यांची भरती बंद केली, याबद्दल पोलिस दलाचे आणि केंद्रीय राखीव दलाचे अभिनंदन केले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांनी गडचिरोली पोलिस दलाला १ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला. सोबतच पुढील दोन ते अडीच वर्षे सजग राहण्याचे आणि लोकांचा यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ करण्याचे आवाहन केले. *विकास आणि रोजगार* गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक येत असून, हा जिल्हा 'स्टील मॅग्नेट' बनत आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना ९० टक्के स्थानिकांना रोजगार देण्याच्या अटीवरच परवानगी दिली जात असून, १ लाख स्थानिकांना रोजगार देण्याचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले. गडचिरोलीत इन्फ्रास्ट्रक्चर उभारताना जल, जमीन, जंगल यांचा नाश होऊ नये यासाठी ५ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पुढील काळात गडचिरोलीला देशाचा ग्रीन स्टील हब तयार करण्यासाठी योजना आख्याल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली की, २०२१ पासून आतापर्यंत १४० माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे, ८१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, तर ९३ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यावेळी नक्षल पीडित कुटुंबांना धनादेशांचे वितरणही करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक एम रमेश यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला संबंधीत अधिकारी व मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. 0000