06 October, 2025

किटकनाशके, बुरशीनाशके फवारताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी - जिल्हाधिकारी

हिंगोली(जिमाका), दि. 06 : किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करतांना निष्काळजीपणामुळे, अनावधानाने अथवा नजर चुकीने विषबाधा होऊ शकते ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी याबाबत किटकनाशके, बुरशीनाशके उत्पादक कंपन्यांनी तसेच कृषि विभागाने क्षेत्रीय स्तरावर व्यापक प्रमाणात कार्यशाळांचे आयोजन करून मार्गदर्शन करावे. तसेच विषबाधा होऊ नये याबाबत प्रचार व प्रसिध्दी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व कृषि तज्ञांनी आयोजित बैठकीत दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली किटकनाशके वापरामुळे होणाऱ्या विषबाधा व त्यावरील उपाययोजनासंबंधी तज्ञ समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक एम. साखरे, कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नारायण भालेराव, सर्व तालुका कृषि अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व गुण नियंत्रण निरीक्षक तसेच किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके उत्पादक कंपन्यांचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी वारा शांत असताना म्हणजे सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा फवारणी करावी. फवारणी वाऱ्याच्या प्रवाहाच्या दिशेने करावी. किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करण्यापूर्वी शरीराच्या उघड्या भागावर खोबरेल तेलाचे लेपण करुन फवारणी करावी. त्यामुळे त्वचेला बाधा होणार नाही. फवारणी करताना किटकनाशकाचा त्वचेशी व डोळ्याशी संपर्क होणार नाही याची दक्षता घ्यावी. फवारणी करतांना किटकनाशकाचे अंश नाकाव्दारे श्वसन मार्गात व तोंडाद्वारे पोटात प्रवेश करणार नाहीत, यासाठी नाकाला व तोंडाला मास्क, रुमाल बांधावा. तसेच डोळ्यावर चश्मा घालावा, केस झाकावेत. फवारणी करताना अंगभर कपडे घालावेत. शक्यतो वॉटर प्रूफ सुरक्षा कीटचा वापर करावा. पिकाची उंची एक फूट वा त्यापेक्षा जास्त असल्यास फवारणी करताना गम बुटचा वापर करावा. फवारणीचा व्यवसाय करणारे शेतकरी, शेतमजूर यांनी तालुक्याच्या आरोग्य केंद्रामध्ये नियमित आरोग्य तपासणी करुन घ्यावी. किटकनाशके, बुरशीनाशके पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून व खाद्यपदार्थापासून दूर ठेवावेत. तसेच फवारणी नंतर फवारा व किटकनाशकाचे रिकामे डबे वाहत्या पाण्यात धुऊ नये. किटकनाशकाचे रिकामे डबे इतर उपयोगासाठी न वापरता ते खोलवर जमिनीत पुरुन टाकावेत. किटकनाशके, बुरशीनाशके फवारणी करतांना ते वा त्यांचे अंश जनावरांच्या चाऱ्याच्या, खाद्यपदार्थाच्या संपकांत येणार नाहीत वा त्यावर उडून जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विहीर, नदी, नाले, ओढे अथवा पानवठे यांच्या संपर्कात किटकनाशके, बुरशीनाशके येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. फवारणी करताना वा फवारणी झाल्यानंतर शेतकरी, शेतमजुरास अस्वस्थ वाटत असल्यास घरगुती उपचार न करता त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी दाखल करावे. तसेच प्रसार मध्यमांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वर्तमानपत्रातून याची मोफत व व्यापक प्रमाणात प्रसिध्दी देण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व कृषि विभागाने केले आहे. ढगाळ वातावरणात ईसी फॉर्मुलेशनऐवजी एससी फार्मूलेशनच्या किटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करावी, असे कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी कळविले आहे. *****

No comments: