30 October, 2025

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ

1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान केवडिया गुजरात येथे होणाऱ्या भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग मुंबई, दि २८ : 31 ऑक्टोबर 2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी (150 व्या) जयंती वर्षानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत केवडिया, गुजरात येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संचलन कार्यक्रमात यंदा प्रथमच महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ सहभागी होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे या वर्षी “स्वराज्य: एकतेचा धागा” या संकल्पनेवर हा चित्ररथ साकारण्यात आला आहे. या चित्ररथात अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान असल्याचे दर्शन घडते. त्यांच्या मागे वारकरी संप्रदायातील वारकरी यांची मूर्ती तर पार्श्वभूमीवर मराठा आरमारातील प्रसिद्ध गुराब नौका दर्शविण्यात आली आहे. या माध्यमातून राज्याच्या वैभवशाली इतिहासाची आणि एकतेची झलक दर्शविण्यात आली आहे. या चित्ररथासोबत 14 कलाकारांचा चमू सांस्कृतिक सादरीकरण करणार असून, महाराष्ट्राच्या विविधतेतून एकतेचा संदेश देणारे हे सादरीकरण राष्ट्रीय स्तरावर राज्याची सांस्कृतिक ओळख अधोरेखित करेल. तसेच, 1 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भारत पर्व अंतर्गत महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या सांस्कृतिक कार्य विभागांद्वारे संयुक्त सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम 7 -8 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडेल. महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमात राज्यातील समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविण्यासाठी गोंधळ नृत्य, कोळी नृत्य, लावणी, तसेच वारी परंपरेवर आधारित सादरीकरणे यांचा समावेश असलेले सुमारे 15 ते 20 कलाकारांचे पथक सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आहे या उपक्रमांद्वारे महाराष्ट्र राज्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरेचे वैभव राष्ट्रीय तसेच आंतरराज्यीय पातळीवर प्रभावीपणे सादर होणार आहे. ०००० संजय ओरके/विसंअ

No comments: