15 October, 2025

शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 15: वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न् व माहिती समृध्द समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास होणे आवश्यक आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थरितीने जतन करुन त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांना वाचनाची आवड व प्रेरणा निर्माण करणे व वाचनाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी दरवर्षी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा (15ऑक्टोबर) हा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन"साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त विविध साहित्यकृतींचे, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हिंगोली येथे करण्यात आले होते. याचे उद्घाटन जिल्हा सांख्यिकी अधिकारी एस. एम. रचावाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, सहायक जिल्हा सांख्यिकी अधिकारी अतीवीर करेवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, श्रीमती मोहिनी दिक्षीत, चंद्रकांत नानगरे, मिलिंद सोनकांबळे, शंभूनाथ दुभळकर, ग्रंथालय पदाधिकारी व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी 50 ते 60 विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त शासकीय वाचनालयास भेट दिली व ग्रंथालयाची माहिती करुन घेतली. तसेच आयोजित ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतला. ग्रंथप्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका हिंगोली येथे सर्वांकरिता खुले असून सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व शासकीय ग्रंथालयाचे सभासद व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे. ****

No comments: