15 October, 2025
वसमत येथे ग्राम बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण संपन्न
हिंगोली(जिमाका), दि. 15: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत कार्यरत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने ‘मिशन वात्सल्य’ योजनेअंतर्गत वसमत येथील पंचायत समिती सभागृहात नुकतेच ग्राम बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात वसमत येथील गट विकास अधिकारी प्रफुल तोटेवाड आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रिया लखमोड हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून सर्वांनी सजगतेने कार्य करणे गरजेचे आहे. बालकांच्या समस्या जाणून घेऊन सर्वांनी त्याबाबत जागरूक राहून त्यांचे निरसन करणे गरजेचे आहे. आपण बालकांना चांगला व वाईट स्पर्श याविषयी माहिती द्यायला हवी जेणेकरून कोणीही बालकांचा गैरफायदा घेऊ शकणार नाही, याविषयी गट विकास अधिकारी प्रफुल तोटेवाड यांनी माहिती दिली.
गावातील बालविवाह होण्याची शक्यता असलेल्या कुटुंबांच्या घरी ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून भेट देऊन त्यांचे समुपदेशन करून बालविवाह थांबविण्यात यावेत आणि बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीकोनातून कार्य करावे अशी माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रिया लखमोड यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी तर सूत्रसंचालन कायदा तथा परीविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित यांनी केले.
या प्रशिक्षणात विविध विषयांवर संबंधित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ग्राम बाल संरक्षण समितींची भूमिका, जबाबदाऱ्या व बाल संरक्षण यंत्रणेचे कार्य तसेच ग्राम बाल संरक्षण समितीचे गठन याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी महत्त्व स्पष्ट केले. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत कायदेशीर बाबी आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत तसेच दत्तक विधान कायदेशीर प्रक्रिया याविषयी कायदा तथा परीविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित यांनी माहिती दिली. महिला व बाल विकास विभागाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजन, प्रतिपालकत्व योजना, अनाथ प्रमाणपत्र, बालगृह, निरीक्षणगृह यासह विविध योजनाबाबत सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाइन 1098 नंबर बाबत तात्काळ सेवा व फोन रिस्पॉन्स सिस्टीमची माहिती चाईल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी दिली. आभार प्रदर्शन बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे यांनी केले.
या प्रशिक्षणासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ती रेश्मा पठाण, माहिती विश्लेषक शेख रफिक, लेखापाल शीतल भंडारे, क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुद्ध घनसावंत, चाईल्ड हेल्पलाइन 1098 चे सुपरवायझर धम्मप्रिया पखाले, श्रीकांत वाघमारे, केस वर्कर तथागत इंगळे, राजरत्न पाईकराव, सुरज इंगळे, समुपदेशक अंकुर पाटोडे, सखी वन स्टॉप सेंटरचे जहीर खान गफूर शाह यांनी सहकार्य केले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment