03 October, 2025

जलजीवन मिशनचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करा -- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 03 : जलजीवन मिशनचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या उप अभियंता व कंत्राटदारावर कारवाई प्रस्तावित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आयोजित आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन अंतर्गतच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक आज त्यांच्या कक्षात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पाणीपुरवठा विभागामार्फत सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामाबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार सद्यस्थितीत जिल्ह्यातील 211 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून उर्वरीत योजनांच्या प्रगतीच्या विविध टप्प्याबाबत माहिती देण्यात आली. जुलै ते सप्टेंबर 2025 या तीन महिन्यामध्ये देण्यात आलेल्या उप विभागनिहाय उद्दिष्टानुसार पूर्ण करावयाच्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. दिलेल्या उद्दिष्टानुसार काम न केलेल्या उप अभियंता व कंत्राटदारांविरुध्द कारवाई प्रस्तावित करावी. जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांची त्रयस्थ तांत्रिक तपासणी करण्यात येऊन त्रयस्थ तांत्रिक तपासणी संस्थेमार्फत अहवालानुसार प्राप्त झालेल्या त्रुटीची पुर्तता तात्काळ करावी. यासाठी हयगय करणाऱ्या संबंधित कंत्राटदार व उपअभियंता यांना नोटीस देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. त्यांनतर त्यांनी संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यातील सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, सर्व संबंधित उप अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता, टाटा कन्सल्टींग इंजीनियर्स लिमिटेड त्रयस्थ तांत्रिक तपासणी संस्थेचे प्रतिनिधी तसेच वॅपकॉस लि. या अंमलबजावणी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. *****

No comments: